आ. प्रशांत ठाकूर यांच्या पाठोपाठ भाजपचे आ. महेश बालदी अडचणीत

भिवंडीवाला ट्रस्टच्या जमिनीचे व्यवहार वादाच्या भोवर्‍यात
। उरण । विशेष प्रतिनिधी ।

पनवेल येथील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावावर भूखंड रद्द केल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपाचे उरण येथील आमदार महेश बालदी हे देखील अडचणीत आले आहेत. खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टच्या जमिनीचे सर्वच व्यवहार आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून ट्रस्टमधील काही सदस्यांनी ट्रस्टचे नाव जमिनीच्या नोंदीवरून काढून टाकले. तसेच ही जमीन परस्पर विकली. यापैकी 22 एकर जमीन बालदी यांनी खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ट्रस्टचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ट्रस्टच्या सदस्याकडूनच उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनी सुमारे 22 एकर जमीन खरेदी केल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील एल.टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.भिवंडीवाला ट्रस्टची शेकडो एकर जागा नवी मुंबई परिसरात आहे. यापैकी बहुतेक जागा ही सिडकोच्या कार्यक्षेत्रात येते. ट्रस्टमधील एका सदस्याने बनावट कागदपत्रे तयार करून ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून ट्रस्टच्या नावाची नोंद हटवली. त्यानंतर त्याने या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंडांची मागणी केली. खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून या ट्रस्टीने काही भूखंड बिल्डरांना विकून टाकले. त्यामुळे ट्रस्टचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची जमीन खरेदी करणार्‍यांमध्ये अनेक नामवंत बिल्डरांचा समावेश आहे. उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनीही 2018 भिवंडीवाला ट्रस्टची सुमारे 22 एकर जागा 16 कोटी 45 लाख रुपयांना खरेदी केली. हे सर्व व्यवहार बेकायदा झालेले असल्यामुळे याप्रकरणी ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांनी मुंबईतील एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

या चौकशीमुळे आमदार महेश बालदी यांच्यासह ट्रस्ट जागा घेणार्‍या अन्य बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आमदार बालदी यांनी दोसू भिवंडीवाला याच्याकडून जमीन घेतली असून दोसू यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून आहे. याप्रकरणी बालदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.नवी मुंबईतही गुन्हे दाखलभिवंडीवाला ट्रस्टची नोंदणी ही मुंबईत असल्यामुळे जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुंबईच्या एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी नवी मुंबईमध्येही गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र त्यांची चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही. गुन्हे दाखल होऊन अनेक वर्षे उलटले असले तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही, अशी खंत फरिदा दुबाश यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version