| सांगली | प्रतिनिधी |
पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून मुंबई परिसरातील डॉक्टर महिलेने स्वतःवर ब्लेडचे वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी फाटा परिसरात घडली. शुभांगी समीर वानखडे (44), इएसआयएस हॉस्पिटल, मुंबई असे तिचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शुभांगी मंगळवारी (दि.2) रात्री उशिरा स्वतःच्या चारचाकीमधून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणेच्या दिशेने जाणाऱ्या विठ्ठलवाडी गावच्या हद्दीतील पांढरा वडाजवळ आल्या. रस्त्याकडेला मोटार थांबवून स्वतःच्या डाव्या हाताच्या व गळ्याच्या नसा कापून घेतल्या. त्या बेशुद्धावस्थेत मोटारीच्या मागील बाजूस पडलेल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्याच अवस्थेत त्यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, गळा व हाताच्या नसा कापून घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शुभांगी या स्वतः डॉक्टर होत्या आणि त्या पुणे येथील एका रुग्णालयात नोकरी करत होत्या. पतीदेखील शासकीय वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. सकाळी रुग्णालयात कामावर जाते, असे सांगून त्या बाहेर पडल्या होत्या. मात्र, रात्री उशिरा त्यांनी नसा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.