| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल सेवा सोमवारी (दि.20) सकाळी साडेआठच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकात विस्कळीत झाली होती. त्यामुळे चाकरमानी नागरिकांचे मोठे हाल झाले होते. डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरून रिकामी लोकल जात असताना तिचा एक डबा अचानक रुळावरून घसरला. ही घटना डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो मार्गावर घडली. डबा रुळावरून उतरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे मागून येणाऱ्या दोन ते तीन लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळच्या गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने स्थानक परिसरात आणि फलाटांवर प्रचंड गर्दी झाली होती. तसेच, भर उन्हात अनेक प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालत जावे लागले.






