ठेकेदारासह इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

नागाव-खारगल्लीदरम्यान रस्त्यावर केलेल्या कामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात बोरपाडा येथील प्रकाश काशिनाथ भगत (54) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदार, इंजिनियर आणि कामावर देखरेख करणाऱ्या कंपनीच्या टीम लिडरविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव ते रेवदंडा रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू आहे. नागाव येथील खारगल्ली बसथांब्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले होते. मात्र, मध्यभागी खोदलेल्या खड्ड्यातील मातीचा ढिगारा रस्त्यावरच ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी सुरक्षा बॅरिकेड्स, ब्लिंकर किंवा धोक्याचे सूचना फलकही लावण्यात आले नव्हते. यामुळे झालेल्या अपघातात प्रकाश भगत यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ठेकेदार जगदिस्वरण राजू आणि इंजिनियर प्रेमचंद मुरली (30) यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीचे टीम लिडर रामकिसन शर्मा यांनीही देखरेखीची जबाबदारी पार पाडली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version