। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबामधील एका व्यावसायिकाकडून विराज राणे याने पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी मागणारा शिंदे गटातील आमदार दळवी यांचा समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याला पोलिसांकडून अभय मिळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग-पेण मार्गावरील चेंढरे बायपास नजीक बिकानेर स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. या दुकानातून वेगवेगळ्या ग्राहकांना खराब माल दिला असा बनाव करण्यात आला. सोशल मिडीयावर बदनामी करून दुकान बंद करतो. कारवाई नको असल्यास पाच लाख रुपये देऊन विषय संपवून टाका, अशी धमकी दिली. त्यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याने हा वाद विकोपाला गेला. राणेकडून मारहाण करून शिवीगाळीदेखील करण्यात आली. याप्रकरणी विराज राणेसह पाच जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील आरोपींना पोलीसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, विराज राणे हा आरोपी शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांचा समर्थक आहे. त्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिंदे गटातील दळवी यांच्या समर्थकाकडून होणार्या या प्रकाराबाबत नागरिकांकडून नाराजीचे सुर उमटत आहेत. आता पोलीस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.