ध्वनी प्रदुषण रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
गेली दोन वर्ष कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. यंदा, मात्र उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्याने थाटामाटात साजरा होणार्‍या विसर्जन सोहळ्यांमध्ये ध्वनिप्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी पनवेलमधील विविध मंडळांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. निर्बंधमुक्त सणामुळे यंदा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशात विसर्जन सोहळ्यानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुका लक्षवेधक करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो.

त्यामुळे यंदा गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे, याच अनुंषगाने मिरवणुकांमधील होणारा दणदणाट टाळण्यासाठी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रबोधनही केले आहे. तसेच ध्वनिप्रदूषण केल्यास होणार्‍या कायदेशीर कारवाईची कल्पना पण दिली आहे; मात्र दोन वर्षे शांत असलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवरणे एवढे सोपे नसल्याने ध्वनिप्रदूषणमुक्त मिरवणुका करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.


आवाजामुळे बहिरेपणाचा धोका
नेहमीचे बोलणे साधारणपणे 70 ते 80 डेसिबलपर्यंत असते. त्यामुळे कानावर फारसा ताण पडत नाही. मात्र शंभर डिसिबलच्या पुढे आवाज ऐकला, तर कानावर ताण पडतो. त्यामुळे केसतंतू खराब होऊ शकतात. यात असलेल्या सूक्ष्म केसांना कायमचे नुकसान पोहोचते. यातून तात्पुरते किंवा कायमचे बहिरेपण येते.

डीजेच्या आवाजाने कायमचे बहिरेपण येऊ शकते. तसेच 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे शारीरिक आणि मानसिक आजारालाही आमंत्रण मिळते. अशा मिरवणुकीत थांबणे धोकादायक आहे.

– डॉ. सुनील सस्ते


गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या गेल्या आहेत. कार्यकर्त्यांना ध्वनिप्रदूषणाबाबतचे कायदे आणि होणार्‍या कारवाईचे स्वरूप सांगितले आहे. तसेच ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

– रूपाली आंबुरे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई

Exit mobile version