| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धा सुरु होत असून, भारतीय संघ नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. भारताचा सलामीचा सामना चिलीविरुद्ध होणार आहे. भारताने या स्पर्धेत दोनदा विजेतेपद मिळवलेले आहे. 2016 मध्ये लखनऊमध्ये अजिंक्य ठरताना हरेंद्र सिंग हे प्रशिक्षक होते. हरेंद्र सिंग सध्या भारताच्या सिनियर महिला संघाचे मार्गदर्शक आहेत.
भारताचा ‘ब’ गटात समावेश असून चिली, ओमान आणि स्वित्झर्लंड हे इतर संघ आहेत. पाकिस्तानने भारतातील या स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी ओमानला संधी देण्यात आली आहे. श्रीजेश यांची ही कसोटी दोन वेळचा ऑलिंपिक पदकविजेता गोलरक्षक ते प्रशिक्षक असा प्रवास केलेल्या पी. आर. श्रीजेश यांच्यासाठी ही स्पर्धा सर्वांत मोठी परीक्षा ठरणार आहे. भविष्यात वरिष्ठ संघाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने ते आपली क्षमता सिद्ध करण्यास उत्सुक आहेत. मलेशियातील सुलतान ऑफ जोहर करंडक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भारताने या अगोदर 2001 होबार्ट आणि 2016 लखनौमध्ये झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. 1979 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत जर्मनी सात विजेतेपदांसह सर्वाधिक यशस्वी संघ आहे. अर्जेंटिनाने 2005 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावल्याने भारतासह दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विजेतीपदे त्यांच्याकडे आहेत. पाकिस्तानने 1979 मध्ये फ्रान्समधील व्हर्साय येथे पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते, तर ऑस्ट्रेलियाने 1997 मध्ये मिल्टन कीन्स येथे भारतावर मात करून किताब पटकावला होता. गतवेळेस क्वालालंपूर (2023) मध्ये भारताने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कास्यंपदकाच्या सामन्यात भारत स्पेनकडून 1-3 असे पराभूत झाला. या वेळी चेन्नई आणि मदुराई अशा दोन शहरांत सामने होणार आहेत.
हॉकी विश्वकरंडक जिंकण्याची संधी
