2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरूद्ध पराभवानंतर भारतीय संघ आणि चाहते काहीसे काळजीत असतात. कारण, अलीकडे भारतीय संघाने कोणतीही स्पर्धा जिंकली नाही. त्यामुळे कप्तान रोहित शर्मा आज ऐच्छिक सराव असतानाही अॅडिलेड क्रिकेट ग्राऊंडवर सरावासाठी आला होता. रोहित शर्माकडे नेतृत्व आल्यापासून त्याच्या वैयक्तिक फलंदाजीला मात्र दृष्ट लागली आहे. आज सरावाच्या वेळी वेगात चेंडू फेकणार्या सपोर्ट स्टाफ रघुच्या चेंडूचा त्याचा मनगटावर आघात झाला. काही मिनिटांसाठी सराव थांबवून तो परतला. बर्फ लावून त्याने तात्पुरता उपाय केला खरा; मात्रच फलंदाजीच्या फॉर्मच्या शोधात असलेल्या भारताच्या कप्तानाला इंग्लंडविरूद्ध उपांत्य फेरीत फॉर्म गवसेल का?
भारतापुढे उपांत्य लढतीसाठी यापेक्षाही अनेक गहन प्रश्न आहे. तरूण यष्टीरक्षक फलंदाज ॠषभ पंतला उपांत्य फेरीत संधी द्यायची, का पुन्हा एकदा दिनेश कार्तिककडे वळायचे? पंतचे डावरेपण आणि दिनेश कार्तिकचे थेट पहिल्या चेंडूपासून मोठे फटके फटकाविण्याची क्षमता यापैकी कशाला पसंती द्यायची?
इंग्लंडकडे असलेला फिरकी गोलंदाज मोईन अलीचा निर्णायक षटकात कोण योग्य सामना करू शकतो? लेगस्पीनर अब्दुल रशिदला इंग्लंडने संधी दिल्यास कोणाला पुढे करायचे? इंग्लंडकडेदेखील अशाच समस्या आहेत. अॅडिलेड मैदानाच्या दोन्ही स्वेअर अंगाची छोटी सीमारेषा गोलंदाजांच्या कल्पकतेची व अचूकतेची कसोटी घेतात. अॅडिलेडमधील गेले दोन दिवस वाढलेले तापमान खेळपट्टीवर निश्चित परिणाम करणार आहे. खेळपट्टीचा वेग उष्णता वाढल्याने कमी होणारच आहे. त्यापेक्षाही दोन्ही संघांना वाटणारी काळजी म्हणजे खेळपट्टी अधिक कोरडी झाल्यास व चेंडू त्यावर ‘ग्रीप’ करायला लागल्यास कुणाला खेळावायचे?लेगस्पिनर यजुवेंद्र चहलला संधी द्यायची का, या विचारांनी भारताला त्रस्त केले आहे. अक्षय पटेल की हर्षद पटेल असे अनेक प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडले आहेत. आपापल्या फ्रॅन्चायझींतर्फे भरपूर संधी मिळालेले काही आयपीएल स्टार या विश्वचषकात अजून चमकले नाहीत किंवा त्यांना पुरेशी संधी तरी मिळालेली नाही.
ऑस्ट्रोलियातील अचानक बदलले हवामान आशिया खंडातील भारत, पाकिस्तान या संघांनाच अधिक मदत करणार हेही निश्चित. त्यामुळे न्यूझीलंड व इंग्लंड संघाचे डावपेच कसे बदलले आहेत, तेही पाहावे लागेल.