। वसई । वृत्तसंस्था।
उत्तनच्या येडू कंपाउंड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एका सहा वर्षीय मुलचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काशिमीरा येथील किरण हर्षद कॉलर (6) आपल्या आईसोबत आजीकडे उत्तन येथील येडू कंपाउंड येथे राहायला गेला होता. मात्र, खेळण्यासाठी बाहेर पडलेला किरण बराच वेळ झाला तरी घरी आला नाही म्हणून त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. त्याचवेळी घराच्या बाजूला पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्याच्या बाजूला त्याचे चप्पल दिसल्याने तो खड्ड्यात बुडाला असल्याचा संशय कुटुंबियांना आल्याने त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. माहितीनुसार अग्निशमन विभागाने डबक्यात शोध घेतला असता त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती उत्तन पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या जोशी रुग्णालयात पाठवला.