कळंब येथे भरली मुलांची ग्रामसभा

सी एम सी ए संस्थेचा उपक्रम, बालकांसाठी विशेष व्यासपीठ

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील कळंब येथे मुलांच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत तसेच सीएमसीए संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली अनोखी ग्रामसभा शासकीय अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडली. या विशेष ग्रामसभेत मुलांनी शिक्षण, पाणी व स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य, गाव विकासाबद्दलचे प्रश्‍न उपस्थित केले. सीएमसीए संस्था बालग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे वेगवेगळे प्रश्‍न सोडवण्यासाठी किंबहुना बालकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी बालकांना एक विशेष असे व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत आहे.

या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये बालकांचा सहभाग ग्रामविकासामध्ये घडवून आणण्यासाठी तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचे पहिले पाऊल टाकले आहे. त्या माध्यमातून कळंब येथील दत्त मंदिराच्या सभा मंडपात आयोजित केली होती. यावेळी सरपंच माधुरी बदे, सीएमसीए संस्थेचे वरिष्ठ अधिकारी प्रिया नबियार, प्रीता देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया कृष्णमूर्ती, विनोदिनी लुल्ला, मारुळाप्पा आणि नारेन, ग्रामविकास अधिकारी बुरुड, आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या ग्रामसभेत बोलताना नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी शाळा महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थिती आपले हक्क बजावताना जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या हातातून मोबाईल घेऊन त्याचा अतिरिक्त वापर टाळला पाहिजे, तसेच मोबाईल द्वारे होत असलेले सायबर गुन्ह्यापासून लांब राहून करियर घडवण्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुलाच्या सुरक्षेसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व मुलीच्या एकंदरीत सुरक्षेसाठी 112 ही हेल्पलाईन वापरण्याचे आवाहन केले.

कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील यांनी चांगल्या आरोग्यासाठीचे उपाय यावर मार्गदर्शन केले. तर सुभाष देशमुख, चौधरी, परिजाडे दामियात, ग्रामसेवक बुरुड, नीता गाडगे यानी विद्यार्थ्यांस संबोधित केले. तर गाव प्रेरक म्हणून सुवर्णा कोरडे व निखिल चोंडकर यांनी काम केले. यावेळी कळंब परिसरातील सुमारे 250 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version