परिपत्रक काढून त्यांना बोलावण्यात आलं; अजित पवार

‘गर्दी’ जमवण्यावरुन पवारांचा हल्लाबोल

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सरकारी कर्मचाऱ्यांना परिपत्रक काढून बोलावण्यात आल्यावरुन त्यांनी टीका केली. त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सर्व अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका यांना खुशाल बैठकीसाठी बोलावलं आहे. असं राज्यांत कधी झालं नव्हतं. परिपत्रक काढून त्यांना बोलावण्यात आलं आहे. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी या महिला सभेला आल्या तर मग लहान मुलांचं काय? त्यांना कोण सांभाळणार? आता मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली असेल तर अवघड आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री नेमले नाहीत. सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की नवीन पालकमंत्री आल्यानंतर डीपीडीसी बाबत निर्णय घेतील. आता जर निधी खर्च झाला नाही तर पैसे लॅप्स होतील. कदाचित त्यांची अडचण असेल की एका जिल्ह्यात दोन तीन इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हा प्रश्न असेल, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, शिंदे- ठाकरे गटात सातत्यानं वाद होत आहेत. कोणीही आमदार उठतो आणि बंदूक काढतो. बिहार, उत्तरप्रदेश आहे का हे? गृहमंत्री, मुख्यमंत्री काय करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते असे करत असतील तर अवघड आहे. राज्यातील परिस्थिती चिघळत ठेवणं हे राज्याला परवडणारे नाही.

Exit mobile version