अजित पवारांची मळमळ अन तळमळ
| मुंबई | प्रतिनिधी |
तुम्ही आमचे विठ्ठल आहात, आता या वयात आशिर्वाद देण्याऐवजी आमच्यावरच कारवाई करीत आहात, हे अत्यंत वेदनादायक असून, काका आता तुम्ही निवृत्त व्हा, थांबा, असे जाहीर आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच केले. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नव्हता तर देण्याचे नाटक केलेच कशाला असा संतप्त सवालही त्यांनी समर्थक मेळाव्यात केला. मुंबईतील एमआयटी येथे झालेल्या पहिल्याच मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्या मनातील तळमळ आणि मळमळ बाहेर काढली. ती काढताना शरद पवारांवर हल्लाबोलही केला.
राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची बुधवारी (दि.5) पहिलीच जाहीर सभा झाली. या सभेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांनी घणाघाती भाषणं केल्यानंतर अजित पवार यांनीही डॅशिंग अंदाजात भाषण केलं. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची त्यांनी एकप्रकारे चिरफाडच केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. मी चार-पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो. पण गाडी तिथेच थांबते, पुढे काही जात नाही. मलाही असं वाटतं की, मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या असतील तर राज्याचं प्रमुखपद मिळवणे गरजेचे आहे,
अजित पवार, उपमुख्यमंत्री
मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही..
शासकीय अधिकारी असो वा उद्योपती किंवा राजकारणी… पण वरिष्ठ नेते थांबायलाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही, असा हल्लाबोल करताना मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा रोकडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
दादा उवाच
जर आंबेगावात पवार साहेबांनी सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सभा घ्यावी लागेल.
आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये.
राजकारण चाललंय ते पाहता काही निर्णय गरजेचे आहेत.
आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. 2024 मध्येही त्यांचीच सत्ता येईल.
साहेबांनी समाजवादी काँग्रेस, मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारण केलं. वयाच्या पंचवीशी पासून पंच्याहत्तीपर्यंत उत्तम काम करू शकतो, असं सांगतानाच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दाची आढावा घेतला. सोनिया गांधी परदेशी आहेत. परदेशी व्यक्ती या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. आपण ऐकलं. नंतर 1999 ला राष्ट्रवादीची स्थापन झाली. त्यावेळी छगन भुजबळांनी मोलाचं काम केलं. आपल्याला 58 जागा मिळाल्या. काँग्रेसला 75 जागा मिळाल्या. त्यावेळी सरकार आलं. मी आर.आर.पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी मंत्री म्हणून काम केलं. मला पहिल्या टर्मला कृष्णा खोऱ्याचे 7 जिल्हे मिळाले. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही, हे उभा महाराष्ट्र जाणतो. सकाळी-पहाटे कामाला सुरुवात करायचो, आजही करतो. मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. कशसाठी तर महाराष्ट्रासाठी… 2004 ला काँग्रेसचे 69 आमदार होते, राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले. सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीच्या जागा जास्त आहेत, त्यांना सीएम पोस्ट द्यावी लागेल. त्यावेळी विलासरावांनी आम्हाला विचारलं, तुमच्यात सीएम कोण होईल..? चार मंत्रिपदं जास्त घेऊन, आलेली संधी सोडून देण्यात आली… पण ती संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिसला असता, असा दावाही अजित पवारांनी केला.
अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक आयोगाकडे दावा
शरद पवारांऐवजी अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मांडणारं 40 आमदारांचं एक पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच्या दोन दिवस आधीच अजित पवारांनी पक्षाच्या 40 आमदारांचं पत्र निवडणूक आयोगात दाखल केल्याचं स्पष्ट झालं आहे. या पत्रावर ज्या 40 आमदारांच्या सह्या आहेत त्या जून महिन्यातील असल्याची माहिती आहे.
चिन्हाची लढाई
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.