शाडूची मूर्तीकला जिवंत ठेवणारे कलानगर

| उरण | वार्ताहर |
यावर्षी श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी मंगळवार, दि. 2 ऑगस्ट रोजी येत असल्याने नागाच्या मूर्ती घडवून त्यांना रंगकाम देण्यास चिरनेर येथील महिला कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. तसेच महत्त्वाचा समजला जाणारा गणेशोत्सव बुधवार, दि. 31 ऑगस्ट रोजी येत असल्याने चिरनेर कलानगरमधील मूर्तीकारांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती घडविण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पेणच्या गणेशमूर्ती कलेला तोडीस तोड देणारे चिरनेर कलानगरातील 22 कुंभार समाजाचे कुंटुब सुमारे 65 वर्षांपासून मातीबरोबर शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे काम करीत आहेत. कुंभार समाजाला शेती नसल्याने आपल्या कलेच्या पाठबळावर उन्हाळ्यात मातीची भांडी आणि पावसाळ्यात नागाच्या मूर्ती व गणेशमूर्ती, नवरात्रोत्सवात दुर्गामातेच्या मूर्ती घडवून कुंभार समाजाचे बांधव आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

सध्या चिरनेर कलानगरमधील गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, रमेश म्हशीलकर, दामू आण्णा चौलकर, प्रकाश चिरनेरकर, नारायण चौलकर, भालचंद्र हातनोलकर, विष्णू चौलकर, विलास हातनोलकर, रंगनाथ चौलकर, भाई चौलकर, दीपक गोरे, नरेश हातनोलकर, नारायण हातनोकर या कलाकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न घडविता पर्यावरणमुक्त करणार्‍या शाडूच्या मातीच्या मूर्ती घडविण्याच्या कामांना प्राधान्य दिल्याचे चित्र कलानगरात पहावयास मिळत आहे.



महिला कारागिरांनी नागाच्या मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. या मूर्ती नवी मुंबई व मुंबई बाजारपेठेत गेली 25 वर्षे विक्रिसाठी आम्ही घेऊन जात असतो. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून संसाराचा काही अंशी गाडा चालवित आहोत.

– रिना दिपक गोरे



मूर्ती कलेला जागेचा अभाव व आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे मर्यादा पडल्या आहेत.तसेच शाडूच्या मातीत व रंगाच्या किंमतीत होणारी वाढ यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात सातत्याने खंडीत होणारा विद्युत पुरवठा यामुळेही त्रास सहन करावा लागत आहे. तरी शासनाने मूर्ती कारागिरांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली तर कुंभार समाज पुढेही ही कला जिवंत ठेवणार आणि या कलेच्या पाठबळावर समाजाची उन्नती होईल.

– मूर्तीकार प्रसाद चौलकर
Exit mobile version