मतदार यादीतील घोळाविरोधात ‌‘सत्याचा एल्गार‌’

राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर थेट हल्ला; एसआयआर रद्द करण्याची मागणी

| मुंबई | अनंत धनसरे |

मतदार यादीतील कथित घोळाचा पर्दाफाश करण्यासाठी आणि सत्याचा एल्गार पुकारण्यासाठीच हा मोर्चा असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली.

निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू असल्याचे आपण 2017-18 पासून सांगत आलो आहोत, असे राज ठाकरे म्हणाले. या मुद्द्यावर आपण सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही त्यावेळी मांडली होती, असे त्यांनी नमूद केले.



महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभर जल्लोषाऐवजी सन्नाटा का होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महायुतीला संपूर्ण बहुमत मिळाले, मात्र विजयाचा जल्लोष दिसला नाही. असा कुठे विजय असतो का? असा सवाल करत त्यांनी निवडणुकीदरम्यान मतदारसंख्येत झालेल्या वाढीवरही प्रश्न उपस्थित केला. राज्यात 40 ते 60 लाख मतदार अचानक कसे वाढले? असा सवाल करत 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारसंख्येत झालेल्या वाढीचा त्यांनी उल्लेख केला. सत्तेत कोण बसावे, हे ठरवण्याचा अधिकार मतदारांचा आहे; मात्र निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात असेल तर प्रश्न उपस्थित होणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक असण्याची गरज राज ठाकरेंनी व्यक्त केली.

Exit mobile version