1 नोव्हेंबरला मुंबईत काढणार मोर्चा
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अगोदर सध्या राज्यात मतदार याद्या आणि बोगस मतदाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांविषयी आपली तक्रार केली होती. आता राज्यातील सर्वच विरोधक एकत्र आले असून, ते येत्या 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढणार आहेत. एक नोव्हेंबरला शनिवारी निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्यावतीनं विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या गावा गावातून जिल्ह्या-जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत, आणि मतदारांची जी ताकद आहे, ती देशांच्या पंतप्रधानांना आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील, अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांविरोधात सर्व विरोधी पक्ष लढाई लढत आहेत. ही लढाई आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये लढत आहोत. त्यानंतर आता ही लढाई महाराष्ट्रातही सुरू झालेली आहे. त्यातून काय साध्य होईल, याबाबत शंका आहे. आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फार मोठा मेळावा गोरेगावला पार पडला आणि तिथे राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले, त्यांनी सांगितलं मतदान करा किंवा करू नका, निवडणूकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे, आणि या मॅच फिक्सिंगविरोधातच आपली ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीमध्ये आजही 96 लाख बोगस मतदार आजही आहेत, म्हणजे जवळपास एक कोटी, हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत, आणि या घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची भेट घेत घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मात्र विरोधी पक्षाच्या मतांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार काही किंमत दिलेली दिसत नाही असे म्हणत त्यांनी केंद्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी मतदारांच्या घोटाळ्याबाबत दिलेल्या माहितीचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 41लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी याआधीच सांगितलेले आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रात सहा लाख 55 हजार मतदार वाढले, असा दावा काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला.
निवडणूक आयोगाने हात झटकलेले आहेत. मतदारांची यादी आक्षेपार्ह आहे. या यादीत घोळ आहे. विधानसभा निवडणूक घोळ असलेल्या मतदार यादीच्या मदतीने झाली. आता नव्या मतदार यादीतही मोठा घोळ झालेला आहे. लोकशाही प्रक्रियेत आदर्श निवडणूक प्रक्रिया राबवली जात नाही, असा आरोपही सावंत यांनी केला. हे लोकशाहीला घातक आहे. याचा विरोध करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत. त्यासाठी 1 नोव्हेंबर हा मोर्चा जाहीर करण्यात आला आहे. सर्व विरोधी पक्ष या मोर्चात उतरेल, यात शंका नाही, असे म्हणत 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले.







