38 हजारांचा मावा जप्त; चौघांचे परवाने निलंबित
| रायगड | प्रतिनिधी |
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार 183 तपासण्यांमध्ये 177 नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहेत, तर चार दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत. दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, मावा, खाद्यतेल, तूप आणि सुकामेवासारख्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा गैरफायदा घेत काही व्यावसायिक भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकतात. हे प्रकार रोखण्यासाठी रायगड एफडीएच्या पथकाने जिल्ह्यातील विविध मिठाईची दुकाने, किराणा दुकाने, गोदामांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी दरम्यान 177 अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले, तर 2 लाख 17 हजार 500 रुपयांचा चक्रवाढ दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती रायगड अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन मोहिते यांनी दिली.
शहरी भागांत कारवाईला वेग
मे शिवसागर इन्टरप्रायझेस-पळस्पे, चेतक इन्टरप्रायझेस- खारघर, जय भवानी हॉटेल- चौक, जीएन इन्टरप्रायझेस- तळोजा येथील दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाया फक्त शहरी भागात पनवेल परिसरात आहेत, तर तळा, म्हसळा, श्रीवर्धन, अलिबाग, महाड परिसरात आतापर्यंत कोणावरही निलंबनाची कारवाई झालेली नाही.
निरीक्षकांच्या नियुक्त्या
तयार मिठाईला चांगली मागणी असल्याने भेसळयुक्त खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचे उघड होत आहे. याविरोधात सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत, परंतु मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचे कारण देत एफडीएकडून भेसळ खोरांवरील कारवाईला विलंब होत आहे. तक्रार केल्यानंतर एफडीए निरीक्षकास पोहोचण्यास विलंब होत असल्याने मिठाईविक्रेत्यांकडून फायदा घेतला जात होता. अखेर रायगडमधील नागरिकांची मागणी पूर्ण करत राज्य शासनाने जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात जादा मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.
जनजागृतीवर भर
एफडीएने कारवाईवर लक्ष केंद्रित करणाऱ्यांबरोबर मिठाई, फरसाण उत्पादकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतल्या आहेत. दिवाळीकाळात अशा प्रकारच्या चार कार्यशाळांमध्ये 184 जणांनी सहभाग घेतला होता. या वेळी दुकानांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानक कायदा परवाना क्रमांक लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसचे भेसळ आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना आवाहन
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ खरेदी करताना नागरिकांनी गुणवत्ता, पॅकिंगवरील बेस्ट बिफोर तारीख आणि दुकानाचा परवाना क्रमांक तपासावा. भेसळ किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांबाबत संशय आल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.






