खेळाडूंच्या अंगावर याल तर…

गौतम गंभीरचा स्पष्ट इशारा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्यात विराट कोहली व नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादाने मैदान गाजवले. त्यात गौतम गंभीरने उडी घेतल्याने वातावरण अधिक तापले होते. या भांडणाला सात महिने उलटले आणि आज त्यावर लखनौ सुपर जायंट्सचा माजी मार्गदर्शक गंभीरने मौन सोडले. माझ्या खेळाडूंच्या अंगावर याल तर त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल, असे गंभीर म्हणाला.

एक मार्गदर्शक म्हणून, कोणीही माझ्या खेळाडूंसोबत भांडायला येऊ शकत नाही आणि याबाबत माझी थोडी वेगळी भूमिका आहे. जोपर्यंत खेळ चालू होता, तोपर्यंत मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता, पण खेळ संपला की, माझ्या खेळाडूंशी कोणी जोरदार वाद घालत असेल, तर मला त्याचा बचाव करण्याचे सर्व अधिकार मला आहेत, असे गंभीरने सांगितले. या वादानंतर गंभीर आणि कोहली या दोघांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागला होता. त्यांनी आयपीएल आचारसंहितेच्या गुन्ह्याची कबुली दिली होती.

या वादानंतर भारतीय चाहत्यांनी नवीनला टार्गेट करण्यास सुरुवात केले. मैदानावर तो दिसताच चाहते कोहली-कोहली अशा घोषणा देत होते. पण, विश्वचषक स्पर्धेत कोहलीने हा वाद मिटवला. त्याने चाहत्यांना असे ट्रोल करण्यास मनाई केली. आयपीएल 2024 मध्ये गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शन करताना दिसेल.

Exit mobile version