विनायक ललित आणि वरुण देवरे यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळजवळील नेवाळी येथे असलेल्या तपोवन आश्रमामध्ये श्री दुर्गा माता देवीचे मंदिर असून विजय साष्टे हे संन्याशी यांनी ते मंदिर उभारले आहे. त्या मंदिराच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त भक्ती संगीताची मैफल आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंडित दशरथ पुजारी यांचे शिष्य संगीत विशारद विनायक ललित आणि वरुण देवरे यांच्या भक्तीमय गाण्यांची मैफल भरविण्यात आली होती. तब्बल अडीच तास या दोन्ही गायकांनी अनेक अजरामर गीते आणि स्वतः स्वरबध्द केलेली काही नवीन गीते सादर करून वाहव्वा मिळविली.
तपोवन आश्रमातील श्री दुर्गा देवी मंदिराचा वर्धापन दिन भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी पंडित दशरथ पुजारी यांचे शिष्य संगीत विशारद विनायक ललित आणि वरुण देवरे यांना तबल्यावर चैतन्य भागवत यांनी साथ दिली तर या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालक ॲड हेमंत धर्माधिकारी यांनी केले. साष्टे गुरुजी यांनी भक्तांना दत्तगुरु हेच परब्रह्म असून आपले 33 कोटी देव असले तरी ते सर्व एकात सामावले असून मदतीच्या वेळी गुरू परब्रह्म यांचाच जप मनात करावा अशी सूचना केली. या भक्तिमय मैफलीत संगीत विशारद आणि संगीत शिक्षक विनायक ललित यांनी हृदयाच्या तालावर नाचे गणेशु निनादती पैंजणे, मन आनंदे नाचले किती सांगू गुरुराया, तुझे नाम आले ओठी सूर भारावले, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, भक्ती भावे गातो आम्ही तुक्याचा अभंग, अबीर गुलाल उधळीत रंग, भजनी दत्त आला रे, ठकविल्या ठकविल्या गवळणी तब्बल पाच भाषेत सादर केली.
नमोस्तुते नमोस्तुते शारदमाते नमोस्तुते, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला हो भक्ती गीते आणि शेवटी चकोर (भैरवी) सादर केली. तर वरुण देवरे यांनी माँ की शरण नहीं क्यूँ जाता, पडा जगत में धक्के खाता – शिवोम तीर्थजी महाराज, चामुंड माता चामुंडा माता, दूर करे वह विपदा सारी, पार करे भक्तन मन भाता, नादातूनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम, देह देवाचे मंदिर, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, कुठे शोधिसी रामेश्वर, दत्ता दिगंबरा या हो या भजनांनी मैफलीत रंग भरला. तर श्री दुर्गा माता मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दश महाविद्या अंतर्गत श्री बगलामुखी याग आयोजित करण्यात आला होता. त्या आधी गणेश पूजन प्रधान संकल्प, मुख हवन, उत्तरांग हवन, पूर्णाहुती आदी धार्मिक विधी झाले.







