पोलिसांची भीती दाखवत असल्याचा आरोप; स्थानिक आ. महेंद्र थोरवेंवरही महिलांचा रोष
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे उभे राहात असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे. प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून, महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचे चित्र आहे. स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरही महिलांनी आरोप केले आहेत. प्रशासन दडपशाही करतेय. आम्हाला पोलिसांची भीती दाखवली जातेय, असा आरोपही महिलांनी केला आहे.
खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे टाटांचे कॅन्सर रुग्णालय उभे राहात असून, या प्रकल्पासाठी तांबाटी गावचे गावठाण संपादित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही जागा संपादित करताना ग्रामपंचायत किंवा आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही; परंतु नक्की काय करणार याची माहिती द्यावी, किमान पाच एकर जागा गावासाठी सोडावी, अशी येथील महिलांची मागणी आहे.
टाटा हॉस्पिटल तांबाटी येथे येत असल्याची कल्पना तात्कालीन ग्रामपंचायत सदस्यांना नव्हती, तशी यासंदर्भात माहिती दिली नसल्याचे माजी उपसरपंच सारिका लाड यांनी सांगितले. गुरचरण जागा पशु आणि गुरांसाठी चरण्यासाठी असते. परंतु, टाटा हॉस्पिटलसाठी होत असलेल्या जागेत आरक्षित जागा असावी यासाठी पाठपुरावा शासनाकडे करत आहोत. परंतु, आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहू, असा इशारा स्थानिक महिला प्राची बामणे यांनी दिला आहे.
या प्रकल्पाला आमचा विरोध नाही; परंतु आमच्या गावठाणाची सर्व जागा संपादित केल्यावर आमची गुरं कुठं चरणार, चारही बाजूने कंपाऊंड केले जात असल्याने आमच्या शेतात जायचे, मुलांनी खेळायचे कुठे, असा इथल्या महिलांचा प्रश्न आहे, अशी माहिती स्थानिक महिला रंजना राणे यांनी दिली आहे. गावठाण जागेत हा प्रकल्प उभारला जातोय, त्याच्या पलीकडे आदिवासी समाजाची वसाहत आहे. अनेक ग्रामस्थांनीही आपल्या जागेत घरं बांधली आहेत. कंपाऊंड झाल्यावर घरी जायचं कुठून, असा प्रश्न येथील आदिवासी महिलेने माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
तांबाटी येथे उभे राहात असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे. प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून, महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचे चित्र आहे.