| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भाजपसोबत राहून राज्यात सत्ता मिळवणाऱ्या शिंदे गटाने रायगड जिल्ह्यात ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शिंदे गट विरुध्द तटकरे असणारा जगजाहीर असताना आता भाजपसोबत शिंदे गटाने वैर स्वीकारले आहे. कुर्डूसमध्ये राजा केणी यांची उमेदवारी आमदार दळवी यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपला खुलेआम आव्हान दिले आहे. दळवींची ही खेळी भाजप कशा पद्धतीने उधळून लावेल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या प्रकारामुळे भाजप आणि शिंदे गटात कलगीतुरा उघड झाला आहे.
केंद्रासह राज्यात महायुतीची सत्ता आहे. राज्यामध्ये भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादीची युती आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तटकरे विरुद्ध शिंदे गट असे शीतयुद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांना पाण्यात बघत असल्याचे जगजाहीर आहे. रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या साडेचार वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे गटाने कुर्डूसमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. राजा केणी हेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्टपणे आमदार दळवी आपल्या भाषणातून सांगत आहेत. त्यामुळे भाजपला खुले आव्हान शिंदे गटाकडून दिले जात आहे.
भाजपच्या नेत्यांना आव्हान देण्याचे काम राजा केणींसह आमदार दळवी करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील कलगीतुरा आता उघड झाला आहे. परंतु, शिंदे गटातील ही खेळी भाजप कशी उधळवून लावणार आता याकडे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीबरोबरच आता शिंदे गटाने भाजपसोबतही वैर घेतले आहे. हे वैर शिंदे गटातील नेत्यांना महागात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.






