गेल कंपनीत दहशतीचा ‘गोंधळ’

राजकिय दबावामुळे तरुण बेरोजगार; ठेकेदाराची कबुली

| अलिबाग | माधवी सावंत |

अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील गेल कंपनी अंतर्गत डोमेक फॅब्रिकेशन्स प्रा. लि ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जीवन थळे व स्वप्नील ठाकूर या दोन कर्मचाऱ्यांना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांनी राजकिय दबावातून कामावरुन काढल्याचा आरोप केला जात आहे. याबाबतची कबुली ठेकेदारानेच दिल्याने सध्या राजकिय वातावरण तापले आहे. परिणामी, गोंधळींनी गेल कंपनीत राजकिय दबावतंत्र वापरुन सुरु केलेला भ्रष्टाचार, दहशत कधी थांबणार, स्थानिकांच्या बेरोजगारीचे प्रमाण कधी कमी होणार, असा प्रश्न बेराजगार तरुणांनी उपस्थित केला आहे.

वेलवली या गावातील जीवन थळे व स्प्नील ठाकूर हे दोन तरुण गेल कंपनी अंतर्गत येणाऱ्या डोमेक फॅब्रिकेशन्स प्रा. लि कंपनीत गेल्या दोन महिन्यांपासून कार्यरत होते. हे तरुण विरोधकांसोबत असल्याचे लक्षात येताच अनंत गोंधळी यांनी त्यांना कामावरुन काढण्याचे आदेश ठेकेदाराला दिले. गोंधळींच्या दबावामुळे कंपनी प्रशासनाने कोणतेही कारण नसताना त्या दोघांना कामावरुन काढले. याबाबत तरुणांनी विचारणा केली असता कंपनी प्रशासनाने त्यांना अनंत गोंधळींच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याचे सांगितले, असे त्यांचे म्हणणे आहे.

केवळ राजकीय हेतूने तरुणांचा रोजगार हिरावून घेतल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राजकारणासाठी स्थानिक तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप गोंधळींने केले असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. तसेच अनंत गोंधळींनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी तरुणांच्या आशा पायदळी तुडविल्या आहेत, असा आरोप बेरोजगार तरुणांच्या कुटूंबियांनी उपस्थित केला आहे.

घरची परिस्थिती हालाखीची आहे. गावातच कंपनी असल्यामुळे मुलाला कंपनीत रोजगार मिळावा, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. मात्र गोंधळींच्या सांगण्यावरुन कमवत्या मुलाची नोकरी गेली. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिकांच्या जागेत कंपनी आहे. त्यामुळे स्थानिकांना कंपनीत नोकरी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. मात्र अनंत गोंधळी यांच्या सांगण्यावरुन तरुणांना कामावरुन काढल्याचे कंपनीतील राजू धुमाळ तसेच अन्य वरिष्ठांनी स्पष्टपणे सांगितले. अनंत गोंधळींनी केलेल्या अन्याविरोधात नक्कीच आवाज उठविणार असून त्याबाबतचे निवेदनही देण्यात येईल.

साहिल म्हात्रे, स्थानिक तरुण
तरुणांनी केला कॉल रेकॉर्ड
तरुणांना कामावरुन काढल्याप्रकरणी साहिल म्हात्रे याने राजु ढवळे यांना फोल केला असता त्यांनी सांगितले कि, 'अरे समजून घ्या, गोंधळी साहेबांनी त्या दोघांना कामावर घ्यायचे नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यांना कारण विचारले मात्र त्यांनी फक्त नाही सांगितलं. त्यामुळे त्यांना पुन्हा कामावर घेणे, शक्य नाही. तुम्हाला तर परिस्थिती माहित आहे. आमच्या हातात काहीच नाही'. यावरुन गेल कंपनीतील ठेकेदारांमध्ये अनंत गोंधळींबद्दल असलेली दहशत समोर आली आहे.
तरुणांच्या पगाराचे पैसे गेले कुठे?
गेल कंपनीच्या नियमानूसार, मजुरी करणाऱ्याला 700 रुपये दिवस असा रोजगार देणे अनिवार्य आहे. असे असताना तरुणांना केवळ 350 रुपये ठेकेदाराकडून देण्यात येत होते. म्हणजेच पगारातील निम्मी रक्कत नेमकी कुणाच्या खात्यात जात होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अनंत गोंधळी यांच्या सांगण्यानूसार जीवन थळे व स्वप्नील ठाकूर यांना कामावर ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या बॅनरवर त्यांचे फोटो असल्याकारणाने त्यांना कामावरुन काढण्याचे आदेश गोंधळी साहेबांनी दिले. कंपनीने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना कामावरुन काढले नाही. अनंत गोंधळी यांनी सिक्यूरिटी ऑफिसमध्ये त्यांना आतमध्ये न घेण्याचे आदेश दिले होते. तरुणांनी विचारणा केली असता गोंधळी साहेबांना त्यांना कामावर घेण्याबाबत रविवारी विचारले. मात्र त्यांनी नकार दिला. यामध्ये कंपनी किंवा वरिष्ठांचा कोणताही हात नाही.

राजू ढवळे, सुपरवायझर, डोमेक फॅब्रिकेशन्स प्रा. लि
Exit mobile version