हल्लेखोर पसार, पोलिसांकडून शोध सुरू
| उरण | प्रतिनिधी |
द्रोणागिरी नोड सेक्टर 2 धुतूम-पागोटे रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अज्ञात वाहन चालकांनी गैरकायद्याची माणसे गोळा करून हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी ठिक 10.55 च्या सुमारास घडली. योगेश पाटील यांनी प्रसंगी सावधगिरी बाळगून आपली चारचाकी गाडी घटना स्थळावरुन काढल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्ताने सकाळी ठिक 10.55 च्या सुमारास द्रोणागिरी नोड सेक्टर 2 येथील धुतूम-पागोटे रस्त्यावरुन आपल्या चारचाकी गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी एपीएम टर्मिनलस या ठिकाणच्या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करुन ठेवलेल्या कंटेनर ट्रेलरने मागचा-पुढचा विचार न करता आपले वाहन सुरू करुन योगेश पाटील यांच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या उद्देशाने धडक दिली. यावेळी योगेश पाटील यांनी अपघातासंदर्भात ट्रेलर चालकाला जाब विचारायला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान ट्रेलर चालकाने आपल्या इतर सहकाऱ्यांना आवाज दिला. यावेळी आठ ते दहा नशेबाज इसम मागचा-पुढचा विचार न करता योगेश पाटील यांच्या अंगावर धावून गेले.
यावेळी योगेश पाटील यांनी मी याच गावातील आहे असे सांगितले, त्यावेळी गावातल्यास ठोका असा आवाज आल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून योगेश पाटील यांनी घटनास्थळावरून आपली गाडी काढली. दरम्यान, त्या इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. योगेश पाटील यांच्या सावधगिरीमुळे ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
द्रोणागिरी नोडमधील सिडकोच्या धुतूम व पोगोटे ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय सुरू आहे. अशा पार्किंगवर मिळणाऱ्या दारु व अंमली पदार्थांचे सेवन हे बंदरात ये-जा करणारे वाहन चालक करत आहेत. त्या नशेच्या धुंदीत वाहन चालक आपली वाहने रस्त्यावर, सर्व्हिस रोडवर आडवी-उभी करून वाहतूक कोंडीबरोबर अपघाताला धोका निर्माण करत आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता ते आपली दहशत निर्माण करत आहेत. तरी, अशा बेकायदेशीर पार्किंगवर व नशेबाज बेशिस्त वाहनचालकांवर संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.
-पूनम पाटील,
माजी सरपंच पागोटे







