भिसे खिंडीत दरड कोसळली

काही काळ वाहतूक ठप्प

| सुकेळी | वार्ताहर |

दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीमध्ये शनिवारी (दि. 20) पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने पहाटेच्या वेळेत या मार्गावर वाहतूक कमी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले व तात्काळ दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रमाणदेखील वाढले असून, शनिवारी (दि.20) सकाळी नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीमध्ये रोहा बाजूकडील खिंड सुरु होण्याच्या पहिल्याच वळणावर दरड कोसळून भले मोठे दगड व माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. दरड कोसळण्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेल्या झाडांची छाटणी करुन दगड माती बाजूला करुन रस्ता पूर्ववत करुन वाहतूक सुरळीत सुरू केली. यावेळी प्रांताधिकारी ज्ञानेश्‍वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, रोहा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनीदेखील दरडग्रस्त ठिकाणची प्रत्यक्षात पाहणी केली.

दरम्यान, दरवर्षी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यासाठी पावसाळ्याच्या आधीच दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे होते. म्हणजेच, दरड कोसळण्याची शक्यता असणार्‍या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे गरजेचे असतानासुद्धा याबाबतीत बांधकाम विभागाचे कुठेतरी दुर्लक्ष केले असल्यामुळेच अशा घटना या वारंवार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version