| पोलादपूर | शैलेश पालकर |
मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीतील सन 2005 पासून सातत्याने रस्ता खचण्याने ‘डेंजर झोन’ म्हणून ओळखला जाणारा रस्ता आणखी खचला असून, या ठिकाणी मंगळवारी (दि.19) दरड देखील कोसळली आहे.
यंदा अवकाळी पाऊस सुरू झाल्यापासून मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या एन एच 66 या नवीन महामार्गावर तर कधी जुन्या एन एच 17 महामार्गावर दरडी कोसळत आहेत. भोगाव गावाच्या हद्दीतील सातत्याने खोल खचणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली असून, हा डेंजर झोन म्हणून ओळखला जाणारा रस्ता देखील नेहमीपेक्षा जास्त खचल्याचे दिसून आले.
मे 2005 मध्ये खेड येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीने या डेंजर झोनमध्ये मोरीसाठी ब्लास्टींग केल्यानंतर साधारणपणे 90 ते 105 मीटर लांब अंतराचा रस्ता 10 फुटांपेक्षा अधिक खोल खचला आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मलमपट्टी झालेल्या या रस्त्यावर दरड कोसळली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने भोगाव, कातळी बंगला पळचिल व गोलदरा या भागातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी अवकाळी पावसामुळे आणि जून महिन्यातही सुरू असणारे रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदार आणि महामार्ग प्रशासनाकडून धीम्या गतीने सुरू असलेले काम काही कालावधीनंतर बंद झाले आहे. या डेंजर झोनमध्ये तातडीने आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जेसीबी उभा करण्यात आला होता. तो देखील हलविण्यात आला आहे.
येत्या आठ दिवसावर कोकणवासीयांना प्रिय गौरी गणपतीचा सण येणार असताना या ठिकाणी सातत्याने खचणारा ‘डेंजर झोन’ महामार्ग आणि त्यावर कोसळणाऱ्या दरडी यामुळे नजिकच्या काळात मोठी दूर्घटना झाल्यास या परिसरातील 26 गाव व वाडी वस्तीतील जनतेचा धोकादायक मार्गावरून सुरू असणारा दररोजचा प्रवास जीवघेणा ठरण्याची शक्यता लक्षात घेता यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पळचिल येथील माजी उपसरपंच उमेश मोरे यांनी बांधकाम प्रशासन व तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याशी संपर्क साधून विनंती केली. तहसीलदार घोरपडे यांनी तात्काळ दखल घेऊन या मार्गावर तडे गेलेले रस्त्याची पाहणी करून खचलेल्या भोगाव हद्दीतील रस्त्याची पाहणी करून संबंधितांना तात्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले होते. नेहमीप्रमाणे या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येऊन या भेटीचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, डेंजर झोनची धोकादायक परिस्थिती जैसे थे असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. पोलादपूर तालुक्यात गेले तीन दिवस संततधार सुरू असल्याने हा डेंजर झोन रस्ता पुन्हा खोल खचला असून, याच ठिकाणी दरड कोसळून एक भला मोठा दगड रस्त्यावर आल्याने प्रशासन जनतेचा बळी गेल्यानंतर जागे होणार काय अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे. या डेंजर झोनची माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अनेक राजकीय नेत्यांनी पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. त्यावेळी आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत सतत खचणाऱ्या डेंजर झोनची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची भाषा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा डेंजर झोन खचत असून, आज लगतच्या डोंगरातून मोठ्या दगडासह दरडही कोसळल्याने याठिकाणी भेटी देऊन आदेश देणाऱ्यांचा फोलपणा उघड झाला आहे.
कशेडी घाटात खचलेल्या ‘डेंजर झोन’मध्ये कोसळली दरड
