| पोलादपूर | प्रतिनिधी |
कशेडी घाटातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर भोगाव हद्दीत भेगा पडल्याने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारीमार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. येथील भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला असून, नवीन महामार्ग भुयारीमार्गे वळवण्यात आला आहे. या ठिकाणी भोगावच्या हद्दीत घाटरस्त्याला पाच ते दहा मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. येत्या पावसाळ्यात येथील रस्ता खचल्यास भुयाराकडे जाणार्या नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कशेडी घाटरस्त्यावर भेगा पडल्याने भूस्खलन होऊन नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महामार्ग प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारीमार्गे होत असल्याने जुन्या महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे.
भुयारी मार्गाकडे जाणार्या नवीन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर दरडी कोसळून महामार्गावरील वाहतूक जुना घाटरस्ता खचल्याने धोकादायक आणि नवीन पर्यायी भुयारी मार्गात दरडी कोसळण्याच्या शक्यतेने धोकादायक अशी परिस्थिती उद्भवणार आहे.