जाळी सुकविण्यासाठी मच्छीमारांची लगबग

हंगामाचे शेवटचे चार दिवस; परप्रांतिय खलाशी परतीच्या मार्गावर

| रायगड । प्रतिनिधी ।

बंगालच्या उपसागरात धडकलेले रेमुल वादळामुळे समुद्र खवळला असून मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर वेगवान वार्‍यासह पडलेल्या वळीवाच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात मच्छीमारांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी नौका बंदरात ओढण्यास सुरवात केली आहे. मच्छीमारी जाळी सुकविण्यास काढली आहेत. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील विस्तीर्ण मैदानांवर अनेक मच्छीमारांची जाळी पसरलेली आहेत.

येत्या आठवड्यात खलाशी म्हणून आलेले नेपाळी, बिहारी, ओरीसी, उत्तरप्रदेशी कामगार परतीच्या प्रवासाला लागणार असल्यामुळे एक आठवडा आधीच पॅकअप करावे लागले आहे. चार दिवसांनी मच्छीमारी हंगाम संपणार असला. तरी ही 80 टक्के नौका बंदरात स्थिरावल्या आहेत. यंदा मच्छीमारांचा हंगाम यथातथाच गेला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात जहाज-नौकांची डागडुजी करणे, जाळी सुकवून पुढच्या हंगामात वापरात येतील, अशी तजवीज करणे यासाठी मच्छीमारांची तयारी सुरू झाली आहे. माशांचा प्रजननाचा कालावधी असल्यामुळे (दि.1) जूनपासून मच्छीमारी बंद होणार आहे. मासे मिळत नसल्यामुळे (दि.10) मे नंतर मच्छीमारांनी आवरते घेण्यास सुरवात केली. शेवटच्या आठवड्यात कोळंबी बर्‍यापैकी मिळत होती. त्यामधून थोडाफार फायदा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वळवाचा पाऊस आणि वादळीवार्‍यांनी त्यावर पाणी फेरले. त्यानंतर 70 टक्केहून अधिक नौका बंदरात स्थिरावल्या.

नौकांच्या देखभालीसाठी वर्षानुवर्षे वापरण्यात येणारे साहित्य, नौकेवरील जेवणासाठीचा सिलेंडर, नौकांवरील अवजड जाळी सुरक्षित ठेवण्यासाठीचा आटापिटा सुरू झाला आहे. सुमारे 80 टक्के नौका बंदरात दाखल झाल्या आहेत. नौकांवरील जाळी, टेम्पो अथवा ट्रकमधून पर्ससिनेटची जाळी सुकविण्यासाठी मैदानात आणली आहेत. गेले दोन दिवस मैदानात जाळीची वाहतूक सुरू आहे. त्यासाठी दहा ते बारा माणसं मैदानात राबत आहेत. दिवसभर जाळी सुकल्यानंतर ती गुंडाळून आणली जात आहेत. फाटलेली जाळी जागेवरच दुरुस्त केली जात आहे. बंदरांवर उभ्या असलेल्या लाकडी बोटींच्या दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. उरण, करंजा, बोडणी, रेवस, नवगाव, थळ, वरसोली, अलिबाग, आक्षी, थेरोंडा, आग्राव, कोर्लई, बोर्ली, मझगाव, एकदरा, राजपुरी, दिघी, दिवेआगर, जीवनाबंदर भागात नौकांच्या डगडुजीचे कामही सुरू आहे.

Exit mobile version