मच्छिमारांचे आर्थिक गणित कोलमडले
| रायगड | प्रतिनिधी |
1 जून ते 31 जुलै अशी 61 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर 1 ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी तसेच वादळी वारे यांचा जबरदस्त फटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पारंपरिक, रापणकार तसेच ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागल्याने ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक महिने असतानाही खराब हवामानामुळे या दोन महिन्यांत मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही.परिणामी, लहरी हवामान, सततचा पाऊस आणि वादळी वारे यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
नव्या हंगामात चांगल्या प्रकारे मासेमारी करता येईल, अशी अपेक्षा असतानाच नारळी पौर्णिमेनंतर अचानक वादळी हवामान आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मासेमारीत काही दितसांचा खोळा आला. त्यानंतर पुन्य मासेमारी सुरु झाली.मात्र, पुन्हा गौरी-गणपतीच्या काळात वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे खराब हवामानामुळे मासेमारीला मोठा फटका बसला. वादळी हवामानामुळे नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याची वेळ आली. वादळी वाऱ्यामुळे इतर जिल्ह्यातील नौकांना अन्य बंदरांचा आसरा घ्यावा लागला होता.
जिल्ह्यातील काही नौकांना इतर बंदरांत नांगर टाकावा लागला होता.त्याचबरोबर नवरात्रोत्सव सुरु होताच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शक्ती नावाचे वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे हवामान खात्याकडून किनारपट्टीवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मासेमारी नौका किनाऱ्यावर ठेवण्याची वेळ आली.
मासेमारी मोसमामध्ये आतापर्यंत सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे मासेमारी ठप्प झाली. त्यामुळे यावर्षी मत्स्योत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. मत्स्य दुष्काळाच्या संकटाना मच्छिमारांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. तसेच मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने माशांच्या किमतीतही वाढ होणार असल्याने खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता अधिक्त आहे.
बदलत्या हवामानामुळे मासे मिळण्याचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे हजारों रुपयांचे इंथन खर्च करूनही नौका समुद्रात गेल्यावर मासळी जाळ्यात मिळत नाही. योग्य प्रमाणात मासे मिळत नसल्याने इंधनासह खलाशांचा खर्चही भागत नाही. या परिस्थितीमुळे मच्छिमारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
मतलई वाऱ्यामुळे मासेमारी नौका समुद्रात नेणे धोकादायक असते. या वाऱ्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यात अनेक अडथळे निर्माण होतात. जाळी टाकल्यावर ती गुरफटली जाते. त्यामुळे मच्छिमारांच्या हाती काहीच लागत नाही. त्याचा काहीही फायदा होत नसून उलट मच्छिमारांना नुकसानाना सामोरे जावे लागते.
स्थानिक खलाशी मिळत नसल्याने परराज्यातील खलाशी आयात करावे लागत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची अनामत रक्कम नीका मालकांना मोजाती लागते. मात्र, अनामत रक्कम घेऊनही अनेक खलाशी पळून जातात. त्याचा फटका नौका मालकांना बसतो. खलाशांअभावी मासेमारी बंद ठेवावी लागते. डीझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी च इंजिन दुरुस्ती आदीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च आणि मासळी विकून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न याचा ताळेबंदच जुळत नसल्याने मच्छिमार हताश झाले आहेत. त्यातच बँकेचे कर्ज, व्याज तसेच व्याधान्यांकडून ॲडव्हान्स रकमेची परतफेड होत नसल्याने मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.







