| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मूकबधीर लेकराला नोकरी आणि माऊलीच्या अश्रुचा बांध फुटला. अर्थातच हे आनंदाश्रू होते. होय ही सत्य घटना आहे आणि तीही आपल्या पनवेल शहरातील आहे. शनिवार, दि. 13 एप्रिल रोजी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध उमेदवारांमध्ये दोन दिव्यांग उमेदवारांची निवड झाली व एका उमेदवाराला पुढील फेरीसाठी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी एकूण 3 हजार 551 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 872 उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती झाली. यामधील दुसर्या फेरीसाठी 205 उमेदवार निवड झाली. या रोजगार मेळाव्यात 213 उमेदवारांना त्याक्षणी नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्यात 2 लाख 83 हजारांचे सर्वाधिक पॅकेज प्रतिवर्ष देण्यात आले. यावेळी एमबीए, बीई, फायनान्स, डिप्लोमा, 10-12 वी इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी सहभाग घेतला.
या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल यावेळी आलेल्या उमेदवारांनी आयुक्त मंगेश चितळे यांचे शतश: आभार मानले. यावेळी आयुक्तांनी रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांनी अत्यंत विश्वासाने व धैर्याने मुलाखतीस सामोरे जाऊन नोकरी मिळवावी असा सल्ला दिला. शासनाने दिलेल्या 100 दिवसीय कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमांवर आधारित नियोजित केलेल्या या भव्य रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.