लांजातील ग्रामपंचायतीचा आदर्शवत ठराव

ऐन गणेशोत्सवात दारूबंदीचा निर्णय

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

लांजा तालुक्यात सहा ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून विनापरवाना सुरू असलेले दारू धंदे उघडकीस आणले होते. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवरच अवलंबून न राहता नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव करून लांजा तालुक्यातील ग्रामपंचायतीने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. ऐन गणेशोत्सवात दारूबंदीचा घेतलेला हा निर्णय सर्वांसाठी आदर्शवत ठरला आहे.

या निर्णयानुसार गावात कोणाकडे दारू आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला आहे. लांजा तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरेल असे काम वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. तसेच, लांजा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्काराने सन्मानित आहेत. सन्मानित होऊनही काही ग्रामपंचायती हद्दीमध्ये विनापरवाना दारुधंदे सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून दाखल करण्यात आल्या होत्या. या विरोधात दारुबंदीबाबत पोलिसी कारवाईवरच विसंबून न राहताना नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. याला अपवाद बाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायत ठरली आहे.

दारूबंदीचा निर्णय घेणाच्या बापट वाढीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीची दखल तालुका तसेच जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याबाबतचा ठराव दि. 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतिने मंजूर केला होता. तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वाडीलिंबू आणि वाघ्रट गावामध्ये बिअरशॉपी चालवण्यासाठी परवानगी अर्ज करण्यात आले होते. मात्र, या मागणीला ग्रामपंचायतीकडून कडाडून तीव्र विरोध करण्यात आला होता. यानंतर दोनीही गावातील सुशिक्षित तरुण युवक, ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येत दारूबंदी करण्याचा विचार ग्रामपंचायतीसमोर मांडला होता. तात्काळ नागरिकांची एकजूट आणि विचारणेला प्रेरित होऊन ग्रामपंचायतीने या निर्णयाचे स्वागतच केले.

ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे कौतुक
लांजा तालुक्यात दारू बंदी विरोधात पोलिसांचे पाऊल कौतुकास्पद असले तरी तालुक्यात अवैध दारू धंदे पूर्णतः बंद व्हायला हवेत, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने गावांमध्ये पूर्णतः दारूबंदीवर ठराव एकजुटीने केला आहे. यामुळे या ग्रामपंचायतीचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
Exit mobile version