एकनिष्ठ कार्यकर्ता शेकापचा कणा

। नेरळ । संतोष पेरणे ।
कर्जत तालुक्यातील राजकारण हे शेतकरी कामगार पक्षासाठी नेहमी कट्टर आणि ठाम विरोधक असे राहिले आहे. त्यात शेकापची नाळ ही या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेशी जोडलेली असल्याने राजकारणात कितीही स्थित्यंतरे आली तरी शेकापचा कार्यकर्ता जागचा हलला नाही. पक्षाचे विचार सोबत घेऊन कार्यकर्ते आजही काम करीत आहेत. एकनिष्ठ कार्यकर्ता हा शेकापचा कणा आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी किंवा युतीसाठी कोणतीही घाईगडबड करायची नाही, असा सावध पवित्रा शेतकरी कामगार पक्षाकडून घेण्यात येत आहे.

रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. पक्षसंघटन करण्यासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांचा शेकापने कायमचा सन्मान केला. म्हणूनच शेकापचा कार्यकर्ता राजकारणात कितीही स्थित्यंतरे आली तरी हलला नाही. मतांच्या टक्केवारीवर नजर टाकली की, याची आपल्याला प्रचिती येते.

कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष संपला असे म्हणणार्‍यांना पक्षाने वेळोवेळी ताकद दाखवून दिली आहे. मागील 20 वर्षांत दोनदा शेकाप उमेदवार विधानसभा निवडणुकीत थोडक्यात मागे पडला. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल बावटा कधी सोडला नाही. त्यात प्रवीण पाटील यांच्यासारखा आक्रमक तालुका चिटणीस काळाने हिरवल्याने मधल्या काळात शेकापची मोठी हानी झाली. मात्र त्यातूनही पक्ष सावरला आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे राजकारण हे शेतकरी कामगार पक्षासाठी कायम महत्त्वाचे राहिले आहे. बदललेले राजकीय वातावरण आणि राजकीय गणिते लक्षात घेता आताच आश्‍वासने देऊन आघाडी आणि युतीची चर्चा करायची नाही. त्याऐवजी पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी शेकापकडून धोरण आखले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा फायदा लक्षात घेऊन शेकापची वेट अँड वॉचची भूमिका महत्त्वाची आणि कार्यकर्त्यांना बळ देणारी नक्कीच ठरू शकते.

कर्जत तालुक्यात कितीही वेगेवेगळे वारे वाहू लागले तरी शेकापचे दोन सदस्य निवडून येतात. अशावेळी कर्जत आणि खालापूर तालुक्यात अधिक बळ मिळावे, यासाठी शेकाप नेतृत्वाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यासाठी प्रवीण पाटील यांच्या निधनानंतर प्रभारी असलेले तालुका चिटणीससारखे महत्त्वाचे पद 2 ऑगस्ट रोजी पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version