पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चार विषयांवर महापौरांची भेट

| नवीन पनवेल | प्रतिनिधी ।

पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शहर आणि परिसराशी संबंधित चार महत्त्वाच्या विषयांवर निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने सर्वप्रथम खारघर परिसरात मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी केली. या स्मारकामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि मराठी अस्मितेचा गौरव अधिक दृढ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या मागणीत पनवेलमध्ये शतकानुशतके पारंपरिक व्यवसायासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे त्यांच्या उपजीविकेला स्थैर्य मिळेल आणि पारंपरिक उत्पादने नागरिकांना सहज उपलब्ध होतील. तिसऱ्या मुद्द्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतून पनवेलमध्ये शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस शहरात आरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आणि नागरिकांनाही ताजा व दर्जेदार शेतीमाल मिळेल. चौथ्या विषयात महिला आणि मुलींच्या विनयभंगाच्या वाढत्या घटनांचा विचार करून पनवेलमधील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ आणि स्वसंरक्षण विषयक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढून मुलींच्या सुरक्षेला बळ मिळेल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. महापौर नितीन पाटील यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या चारही मागण्यांमुळे पनवेल शहरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांना चालना मिळणार असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version