रायगडात पोपटी पार्ट्यांचे वेध

पुणेरी वालांवर भिस्त ; रुचकर स्थानिक गावठी वालाची प्रतीक्षा


| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली सुधागडसह जिल्ह्यात लज्जतदार पार्ट्यांचे वेध लागले आहेत. रायगडातील पोपटीची आतुरता साऱ्यांनाच आहे. पोपटी म्हटले की, वालाच्या शेंगा, भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु होत आहे. जिल्ह्यातील रुचकर स्थानिक गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यास उशीर लागणार आहे. त्यामुळे खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच बेत करावा लागत आहे. पुणेरी वालाच्या शेंगा 60 रुपये किलोने मिळत आहेत.

जिल्ह्याच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र अवकाळी पावसामुळे नुकसान आणि पोपटी सध्या येथील स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झाल्या नसल्याने पुण्यावरुन आलेल्या शेंगावर खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे. उरणमध्ये काही ठिकाणी गावठी वाल मिळत आहेत.ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पाहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात, तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाणघेवाण होते. अनेक जणांना यातून चांगले उत्पन्न सुद्धा मिळते.

निडीच्या शेंगा प्रसिद्ध
पोपटीसाठी अस्सल गावठी शेंगांनाच पसंती असते. गावठी शेंगांमुळेच खरी लज्जत व चव टिकून राहते. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा विशिष्ट गोड चव व टपोरे दाण्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या शेंगांचा वालही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे या शेंगा तयार होण्यास उशीर होईल, असे येथील रहिवासी ॲड. महेंद्र धामणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना रोजगार
जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडेपंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास साधारण 4 हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. गावठी वालाच्या शेंगांना सुरुवातीला दर चांगला मिळतो. किलोला 100 ते 150 रुपये. नंतर शेंगा सर्वत्र येऊ लागल्यावर शेवटी दर 40 ते 50 रुपये किलोपर्यंत जातो. वातावरणाने साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळते, असे निलेश शिर्के या शेतकऱ्याने सांगितले.

पोपटीसाठी साहित्य
गावठी वालाच्या किंवा पुण्याच्या भरलेल्या टपोऱ्या शेंगा, कांदा, बटाटा, रताळी, मांसाहारी खाणारे असल्यास अंडी किंवा मसाला लावलेले चिकन, ओवा, जाडे मीठ व भामरुडीचा (भांबुर्डी) पाला आणि हे सर्व जिन्नस शिजविण्यासाठी मातीचे मोठे मडके व जळणासाठी लाकूड, पेंढा आणि गोणपाट इत्यादी.

भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष
भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष आहे. याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पालाच्याच रस जखमेवर चोळतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसतानादेखील याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात.

पत्र्याच्या डब्यातही पोपटी
पोपटीसाठी मडक्यांनादेखील खूप मागणी असते. मडके उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तेलाच्या पत्र्याच्या डब्यामध्येही पोपटी केली जाते. अगदी मडक्यात लावतात त्याप्रमाणे कृती करुन पत्र्याचे झाकन घट्ट लावावे व आगीवर उपडे ठेवावे. काही वेळेला मडके फुटते किंवा त्याला तडा जातो आणि आतील साहित्य करपते किंवा अर्धवट शिजते. मात्र, पत्र्याच्या डब्यामध्ये ही भीती नसते. आणि तो वारंवार वापरतादेखील येतो.

दरवर्षी या हंगामात पोपटी पार्ट्यांचे आयोजन करतो. येथील स्थानिक वालाच्या शेंगा पोपटीमध्ये वापरल्या जातात. नाताळ हंगाम व थर्टी फर्स्टला पोपटीला सर्वाधिक मागणी असते. यामुळे उत्पन्नदेखील चांगले मिळते.

तुषार केळकर, पोपटी पार्टी आयोजक व शेतकरी

सध्या पुण्यावरून आणलेल्या वालाच्या शेंगा पोपटीसाठी नेल्या जात आहेत. शनिवारी व रविवारी सर्वाधिक शेंगा विकल्या जातात.

राजेश फोंडे, भाजी विक्रेते, पाली
Exit mobile version