शेतीत डिजिटल क्रांती! महाविस्तार एआयमुळे बाजारभाव एका क्लिकवर

| रायगड | प्रतिनिधी|

शेतीमधील वाढती जोखीम कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ हे क्रांतिकारी मोबाईल ॲप विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह डिजिटल साथीदार ठरत असून, संपूर्ण महाराष्ट्रात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या ॲपमध्ये केवळ तांत्रिक माहितीच नाही, तर कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीक विमा आणि अर्जाची स्थिती याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आधुनिक शेती पद्धती आणि खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ मार्गदर्शनही मराठीत उपलब्ध आहे.

भाजीपाला, फळपिके, कापूस, ऊस आणि कडधान्यांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने शेती कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन ॲपमध्ये दिले आहे. गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असलेले महाविस्तार एआय ॲप जास्तीत जास्त शेतकरी, महिला लाभार्थी व नागरिकांनी डाऊनलोड करून डिजिटल शेतीच्या नव्या युगाचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त महिला शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आपली नोंदणी करावी, यासाठी कृषी विभागातर्फे विशेष मोहीम आणि प्रोत्साहन दिले जात आहे.

पीकनिहाय मार्गदर्शन

ॲपमध्ये भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, कडधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, भाजीपाला, फळपिके व मसाला पिकांसाठी प्रमाणित कार्यपद्धती उपलब्ध आहेत. पूर्व मशागत, बियाण्यांची निवड, पेरणी, खत व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, कापणी आणि साठवणूक याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून कीड व रोगांचे निदान करू शकतात आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपायांची माहिती मिळवू शकतात. खत मात्रा गणकामुळे जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ आणि माती परीक्षण अहवालानुसार योग्य खतांचे प्रमाण सहज समजते.
ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये
अचूक हवामान अंदाज :
स्थानिक पातळीवरील हवामानाची रिअल-टाइम माहिती मिळाल्यामुळे पेरणी, कापणी आणि खत व्यवस्थापनाचे नियोजन करणे सोपे झाले आहे.
एआय चॅटबॉट : शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधणारा चॅटबॉट उपलब्ध आहे.
स्मार्ट रोगनिदान : पिकावर पडलेल्या कीड किंवा रोगाचा फोटो अपलोड करताच एआय तंत्रज्ञानाद्वारे त्याचे निदान होऊन योग्य उपाययोजना सुचवल्या जातात.
बाजारभाव माहिती : स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे अद्ययावत दर शेतकऱ्यांना घरबसल्या समजतात
Exit mobile version