विसर्जन मिरवणुकीतून शक्तीप्रदर्शन; ध्वनीप्रदूषणाचे वाजवले तीनतेरा

न.पा. निवडणुकीची कार्यकर्त्यांकडून रंगीत तालीम
| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरात अनंत चतुर्दशीच्या गणपती विर्सजन मिरवणुकीपेक्षा साखरचौथ गणपती विर्सजन मिरवणुकांना पेणसह रायगड जिल्ह्यात एक विशेष आकर्षण आहे. मात्र, यंदा साखरचौथ गणपती विर्सजनामध्ये ध्वनी प्रदूषणाचे तीनतेरा वाजवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जणू काही नगरपालिका निवडणुकीचे शक्तीप्रदर्शनच पेणकरांना दाखवल्याचे चित्र स्पष्ट होत होते.

पेण शहरात एकूण 36 साखरचौथ गणेश उत्सव मंडळांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली होती. नजीकच्या काळात केव्हाही नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजेल. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मंडळाने स्वतःची एक वेगळी ओळख पेणकरांसमोर व्हावी म्हणून जय्यत तयारी केली होती. यामध्ये प्रत्येक मंडळाचे टी-शर्ट वेगळे, डी.जे. सिस्टीम वेगळी, तर काही मंडळांनी नाशिक ढोलचे आयोजन केले होते. प्रत्येक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष गाणे वाजवून त्यावर ताल धरलेला पहायला मिळाला. डी.जे.चा कर्कश्य आवाज व फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आपणच इतर मंडळापेक्षा कसे वेगळे आहोत व वरचढ आहोत, हा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.

शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे आपल्या पोलीस कर्मचार्‍यांसमवेत मिरवणुकीवर लक्ष देऊन होते. तर, त्या पोलीस खात्याच्या मदतीसाठी पेण शांतता कमिटीचे सदस्य मिरवणुकीच्या शेवटपर्यंत स्वयंसेविकेच्या भूमिकेत काम करत होते.

आवाज वाढवून उल्लंघन
ध्वनी प्रदूषणाच्या नियमानुसार शहरामध्ये ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 या कायद्यातील तरतुदीनुसार, 55 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. तेवढ्याच आवाजाला परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त आवाज वाढवू शकत नाही. दोन टॉप, दोन बेसलासुध्दा कायद्याची परवानगी नाही. परंतु, या सर्वाचे उल्लंघन झालेले पहायला मिळाले. कारण, ही विर्सजन मिरवणूक म्हणजे आगामी नगरपालिकेसाठी आपण सज्ज आहेत. आपल्यासोबत एवढे कार्यकर्ते आहेत, हेच दाखविण्याचा एक प्रयत्न सुरू होता.

रात्री उशिरापर्यंत मिरवणुका
सायंकाळी 5:30 ला सुरू झालेल्या विर्सजन मिरवणुका रात्री 10.30 पर्यंत ध्वनी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून मिरवणुका सुरू होत्या. मात्र, 10.30 नंतर पोलीस प्रशासनाने सर्व मंडळांना डी.जे. बंद करण्याची तंबी दिली. त्यानंतर मिरवणुका या ढोल ताशाच्या गजरात रात्री 12.30 पर्यंत सुरूच होत्या.

Exit mobile version