| नवी दिल्ली । वृत्तसंस्था |
भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये चार सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. या सामन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर काय? सुपर 4 मध्ये प्रवेश कोण करणार ?
आशिया चषकात सहा संघांना दोन गटामध्ये विभागण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ एकाच गटामध्ये आहेत. श्रीलंका, बांगलादेश आणि आफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहे. साखळी सामन्यातील आघाडीचे दोन संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. पाकिस्तानविरोधातील सामन्यात भारताला एक गुण मिळाला. जर नेपाळविरोधातील सामनाही पावसामुळे रद्द झाला तर दोन गुणांसह भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. जर भारताचा पराभव झाला तर नेपाळचा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.
पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.
भारत-नेपाळ सामन्यात पावसाचा अंदाज भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पल्लेकल येथे दिवसाची सुरुवातच पावसाने होणा आहे. सकाळी आठ वाजता हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना तीन वाजता सुरु होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुपारी पावसाने विश्रांती घेती नाही, तर नाणेफेकीला उशीर होईल. त्याशिवाय, दिवसभर पावसाने खोडा घातल्यास सामना रद्दही होऊ शकतो. डकवर्थ लुईस नियमांनुसार, प्रत्येकी 20-20 षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे. पावसामुळे जितका वेळ वाया जाईल, तितके षटके कपात केली जाऊ शकतात. कँडीमध्ये सोमवारी सकाळी 60 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाणेफेकीवेळी म्हणजे दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता 22 टक्के इतकी आहे. पण संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळी 66 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाचा खेळ होऊ शकतो.