अलिबाग तहसील कार्यालयासमोर उपोषण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भरावामुळे शेत जमीनीचे प्रचंड नुकसान झाले असून, त्याची 18 हजार रुपयांची भरपाई देण्यास भराव करणाऱ्या मंडळीनी दिरंगाई केली. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी किरण पाटील न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी त्यांच्या मागणीसाठी सोमवार दि.26 ऑक्टोबरपासून अलिबाग तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. वयोवृद्ध असलेल्या या शेतकऱ्याला तहसीलदार न्याय देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील आंबेघर येथील किरण वामन पाटील हे शेतकरी आहेत. गट नं. 28/2 क्षेत्र 0.27.80 हे.आर या जमीन मिळकतीमध्ये काही मंडळींनी भराव केला आहे. त्यामुळे किरण पाटील या शेतकऱ्याच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी अलिबाग तहसील कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर 11 मे 2024 व 19 जून 2025 रोजी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनामा करूनही कोणतीही कार्यवाही प्रशसासनाकडून झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने 10 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असा इशारा प्रशासनाला दिला होता. याबाबत पत्र देण्यात आले होते. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर अलिबागच्या तहसीलदारांनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यासह भराव करणारी मंडळी होती. तहसीलदारांनी दोन्ही म्हणणे ऐकून घेतल्यावर त्यांच्या मध्यस्थीने भरपाई म्हणून 60 हजार रुपये देण्याचे त्या मंडळींनी मान्य केले. यापैकी 42 हजार रुपये 8 डिसेंबर 2025 रोजी दिले. उर्वरित 18 हजार रुपये अजूनपर्यंत दिले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने न्यायासाठी अलिबाग तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि.26) किरण पाटील या शेतकऱ्याने अलिबाग तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. याबाबत अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.
