| अमरावती | वृत्तसंस्था |
अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावतीत दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शहरातील राजापेठ अंडरपासजवळ सकाळी 8.30 च्या सुमारसा ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून हा चाकू हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर ( 23 ) याला पोलीसांनी अटक केली आहे. अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मार्गे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पायी जात होती. दरम्यान, या मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने तिची वाट अडवली आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केलं. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या नंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी युवतीकडे धाव घेतली. दरम्यान मारेकरी पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून जवळील ऑटो चालकांनी त्याला पकडून चांगलीच धुलाई केली. यानंतर या संपूर्ण घटनेची माहती राजपेठ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या मारेकऱ्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
तर जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याआधी देखील याच मुलाने अल्पवयीन मुलीला अडीच महिन्यांपूर्वी छेडले होते. त्यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा ही दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.