समुद्रातील मासे बंद झाल्याने खवय्यांच्या उड्या
| सुधागड-पाली | वार्ताहर |
पावसाळा सुरू झाल्याने एक जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील मासळीवर पडत आहेत. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.
नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. त्यामध्ये मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल आदी माशांचा समावेश आहे. या मोसमात सापडणार्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी सापडतात. त्याला स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळीवाले मासे म्हणतात. हि गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी व गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे पकडतात. हे विकून त्यांना चार पैसेदेखील मिळतात. पावसाळ्यात गोड्या पाण्यातील मासे आवडीने खातो, असे माणगाव येथील मनीष पाटील यांनी सांगितले.
उधवण किंवा वलगणीच्या माशांना मागणी भरपूर पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदितील मासे शेतातील कमी पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. यावेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच उधवण किंवा वलगणीचे मासे असे म्हणतात. पाऊस वाढल्यावर काही दिवसांत सर्वत्र वलगनीचे मासे पकडण्याची लगबग सुरु होईल, असे शिक्षक टिळक खाडे यांनी सांगितले.
किंमत जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या किमती आहेत मळे - या वर्षी 50 रुपये पाव तर 200 रुपये किलो, मागील वर्षी 40 रुपये पाव किलो तर 150 रुपये किलो. कोलीम (बारीक कोळंबी) - यावर्षी 40 रुपये वाटा, मागील वर्षी 30 रुपये वाटा (एका पानावर वाटा असतो) म्हूर्या - यावर्षी 40 रुपये वाटा, मागील वर्षी 30 रुपये वाटा (एका पानावर वाटा असतो) शिवडा, कटला व वाम - या वर्षी 500 ते 550 रुपये, मागील वर्षी 400 रुपये किलो. मोठी गोडी कोलंबी - या वर्षी 1000 ते 1200 रुपये, मागील वर्षी 800 ते 1000 रुपये किलो. फंटूस - या वर्षी 300 ते 400 रुपये, मागील वर्षी 200 ते 250 रुपये किलो.
गोड्या पाण्यातील मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. सध्या सापडणार्या बहुतांश माशांमध्ये हमखास अंडी असतात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. दरवर्षी या हंगामात मासे पकडतो. त्यासाठी जाळे, पाग, आदी साधनांचा वापर करतो.
जितेश जोशी, तरुण मासेमार, पाली
सध्या गोड्या पाण्यातील मासे खूप मिळत आहेत. शहरात असणार्या नातेवाईकांना आवर्जून भेट म्हणून गोडे मासे नेले आहेत. मळे, शिवडा, कटला व म्हूर्या हे मासे अनेकांना खूप आवडतात.
गृहिणी