सुप्रिया पाटील, अजित पाटील यांना पुरस्कार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित पाटील आणि सहशिक्षिका सुप्रिया पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि.29) मोठ्या उत्साहात पार पडला. पनवेलमधील कळंबोली येथे झालेल्या या कार्यक्रमाचा सत्कार सोहळा कोकण विभाग मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना गेल्या अनेक वर्षापासून कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करीत आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांना उभारी देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहेत. नागाव हायस्कूलच्या सहशिक्षिका सुप्रिया सचिन पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असताना त्यांची व बौध्दीक व शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना टिकवून ठेवणे, शैक्षणिक साहित्याची मदत करणे, शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी प्रोत्साहित करणे, विभागीय राज्यस्तरापर्यंत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पाठविण्यासाठी प्रयत्न करणे, सेवाभावी संस्थेच्या मदतीने विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल अधिक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे, अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेने घेतली. राज्यस्तरिय पुरस्कार सोहळया अंतर्गत कोकण विभाग गुणवंत शित्रक पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.29) पनवेलमधील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. अलिबाग तालुक्यातील नागाव केंद्रातील संचालक मंडळ नागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित पाटील तसेच सहशिक्षिका सुप्रिया पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नागाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक व शिक्षकांना मिळालेल्या या पुरस्काराने नागावसह हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.






