भातसईत रंगणार यात्रोत्सव

| चणेरा | प्रतिनिधी |

आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा पारंपरिक पालखी सोहळा आणि यात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मंगळवार दि.31 मार्च रोजी पालखी सोहळ्याने उत्सवाची सुरुवात होणार असून बुधवार, दि. 1 एप्रिल रोजी यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त हा यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

दोन पौर्णिमा आल्यास सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी उत्सव भरवला जातो. याशिवाय नवरात्रोत्सवही येथे अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. नवस फेडण्यासाठी दूरदूरहून भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात. सध्या देवीचे भगत चिंतामणी सखाराम खरीवले असून खरीवले कुटुंबातील सदस्यांमध्ये देवीचा वारा येत असल्याची श्रद्धा आहे. ही यात्रा दोन दिवस चालते आणि त्यात विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेत नवसाच्या काठ्यांची मिरवणूक काढली जाते. ‘गळ लावणे’ हा यात्रेचा विशेष धार्मिक विधी मानला जातो, जो भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मंगळवार, दि. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता भातसई गावातील येशी मंदिरातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल. ही पालखी झोलांबे, कोपरे आणि लक्ष्मीनगर या गावांमधून फिरत सायंकाळी सुमारे 7 वाजता पुन्हा भातसई येथे परत येईल. या पारंपरिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे.

Exit mobile version