अठरा कोटी रुपयांचा दंड थकित

एक लाख 29 हजार वाहनांवर कारवाई

| अलिबाग | प्रतिनिधी |

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई केली. एक लाख 29 हजार वाहनांवर ही ई चलन कारवाई झाली असून 18 कोटी रुपयांचा दंड थकित आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अवजड वाहनांची खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तसेच वर्षाला सुमारे वीस हजार पेक्षा अधिक दुचाकींची खरेदी होत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली आहे.

वाहन चालविताना अनेक जण हेल्मेट नसणे, टिबलसीट असणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित जिल्हा वाहतूक शाखा स्थापन करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 90 पोलीस कर्मचारी वाहतूक पोलीस म्हणून काम करीत आहेत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा वाहतुक शाखेने ऑनलाईन पध्दतीने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. पॉझ मशीनद्वारे एका क्लीकवर दुचाकीचे छायाचित्र काढून त्या चालकाला दंडात्मक कारवाई झाल्याचा मेसेज पाठविला जात आहे. त्यानुसार त्याने कार्यालयात येऊन अथवा ऑनलाईन पध्दतीने दंड भरण्याची सोय केली आहे. तरीदेखील काही वाहन चालक दंड भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यात वर्षभरात एक लाख 29 हजार वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून 18 कोटी 72 लाख रुपयांचा दंड थकित आहे. वारंवार नोटीस मेसेज पाठवून ही दंड भरण्यास दिरंगाई होत असल्याने लोक अदालतद्वारे दंड वसूल केला जाणार आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Exit mobile version