। रसायनी । वार्ताहर ।
कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावरील चौक रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या माल वाहतूक बोगीला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने आग नियंत्रणात आल्याने मोठी वित्त आणि जिवीत हानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल कंपनीचे पेट्रोलजन्य पदार्थ मालवाहतूक बोगितून घेऊन जाणारी रेल्वे चौक रेल्वे स्टेशनवर उभी होती. हि पेट्रोलजन्य पदार्थची मालगाडी महाराष्ट्रात मिरज येथे जाणार होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बोगीने आग पकडली. आग लागल्याची माहिती मिळताच केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध हे घटनास्थळी पोहोचले. ही आग 19 क्रमांकाच्या बोगीला लागली होती. त्यांनी तातडीने पेट्रोल गॅसकेटला लागलेली आग विझवली. हे गॅसकेट जर पेट्रोलच्या टाकीत पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
रेल्वेच्या आग लागलेल्या बोगीत 27 टन पेट्रोलजन्य पदार्थ होते. अशा 52 बोगी होत्या. तसेच, चौक रेल्वे स्टेशनवर पाण्याची कोणती सुविधा उपलब्ध नाही. चौक पोलिसांनी तातडीने टाटा स्टील, खोपोली नगर पालिका, रिलायन्स, एमआयडीसी पाताळगंगा यांना कळविटाच सर्वांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच, वपोनि मिलिंद खोपडे, सपोनि युवराज सुर्यवंशी, आशिष मोरे, रेल्वे पोनि आशिष कुमार, श्याम साळवी, चौक ग्रामस्थ, गिरीश जोशी, तन्वीर शेख, फिरोज शेख, गणेश कदम, आशिष चौधरी यांच्यासह अनेकांनी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.