। यवतमाळ । प्रतिनिधी ।
वणीतील साईमंदिर चौकात बुधवारी (दि. 26) मध्यरात्रीनंतर आगीने अक्षरश: तांडव घातले. या चौकातील एका व्यावसायिक संकुलाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या एका हॉटेलला आतून आग लागली. या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. आगीदरम्यान हॉटेलमधील सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरून गेला. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग इतकी भीषण होती की, या आगीत हॉटेलमधील चार फ्रिज, खुर्च्या, टेबल, तंदूर फॅन, ओव्हन, कुलर व सजावटीचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या भीषण आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.