। खोपोली । प्रतिनिधी ।
परखंदे गावातील तलावासाठी राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख रुपये खर्च करून तलावाचे काम नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, या तलावात पाणीसाठा वाढावा यासाठी गाळ काढला नाही. तसेच, संरक्षण कठड्याची उंची देखील कमी ठेवली असून, दगड टाकून काँक्रीटचा खर्च वाचवून निकृष्टदर्जाचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांनी आक्रामक पवित्रा घेत ठेकेदाराला जाब विचारण्यात आला. परंतु, ठेकेदाराने उडावाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी काम बंद केले आहे. हे काम पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच, ठेकेदार बदलून चांगल्या ठेकेदाराला काम देण्याची मागणी देखील ग्रामस्थ करीत आहेत.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने गाळ काढून तलावाची खोली वाढविणे गरजे आहे. तलावाचा संरक्षण कठडा सहा इंचही खोल नाही. अशा पद्धतीने कोट्यवधींचा निधी उपलब्ध असतानाही निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे. याबाबत इंजिनियर आणि ठेकेदाराला वेळोवेळी तक्रार करूनही ग्रामस्थांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्यामुळेच संतप्त गावकर्यांनी तलावाचे काम बंद केले आहे.
अंकूश मोरे,
सदस्य, ग्रामपंचायत होराळे