| पनवेल | प्रतिनिधी |
पळस्पे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई, पावसाळी पुरांचे संकट, नदी प्रदूषण, घनकचरा आणि गटार सांडपाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हे प्रश्न आजतागायत प्रलंबित राहिले असून, नागरिकांचे आरोग्य, जीवनमान व सुरक्षितता धोक्यात आली आहे. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात ठाम संघर्ष उभारण्याच्या निर्धाराने पळस्पे मतदारसंघात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पावसाळ्यात पळस्पे परिसरात पुराचे पाणी थेट घरांमध्ये घुसते, रस्ते जलमय होतात आणि नागरिक अक्षरशः अडकून पडतात. दुसरीकडे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व नागरिकांना वणवण करावी लागते. नदी व नाल्यांमध्ये सोडले जाणारे दूषित सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषणामुळे पाणी विषारी बनले असून आजारांचे प्रमाण वाढत आहे. घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून संपूर्ण परिसर दुर्गंधी व रोगराईच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर पळस्पे गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अस्मिता अनिल ढवळे, पळस्पे पंचायत समिती गणातून विक्रांत नारायण घरत आणि एकोण पंचायत समिती गणातून श्रीमती शर्मिला परशुराम माळी यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी थेट संघर्ष करण्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना हा केवळ राजकीय सोहळा न ठेवता, हंड्या आणि पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन पळस्पेतील खरी परिस्थिती प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कोणताही मोर्चा नसून, पळस्पेकरांच्या वेदना आणि असह्य जीवनाची जिवंत साक्ष असल्याचे उमेदवारांनी ठामपणे सांगितले.
20 फेब्रुवारीनंतर एमआयडीसी व एमजीपीच्या विरोधात उपोषणाचा इशारा देत पाणीपुरवठा, सांडपाणी आणि घनकचऱ्याच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. “सांडपाणी व कचरा-मुक्त गाव” ही पळस्पेची नवी ओळख निर्माण करण्यासाठी जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास पळस्पे मतदारसंघातील पाणीटंचाई, पुराचा धोका आणि प्रदूषण याविरोधात निर्णायक व संघर्षशील पावले उचलली जातील, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे. पळस्पेकरांच्या प्रश्नांसाठी हा लढा आता थांबणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.







