आठ ते दहा पक्ष्यांची एकत्र हजेरी; क्रीडापटू आणि पक्षीप्रेमींना दुर्मिळ पर्वणी
| पनवेल | प्रतिनिधी ।
खारघर येथील बेलपाडा मैदानावर आठ ते दहा हुपू (हुदहुद) पक्ष्यांचा थवा पाहायला मिळाला. एरवी एकाकी आढळणारे हे पक्षी एकत्र दिसल्याने स्थानिक नागरिक, क्रीडापटू आणि पक्षीप्रेमींना निसर्गाचा अनोखा अनुभव घेता आला.
बेलपाडा गावाजवळील या मैदानावर सकाळी क्रिकेटच्या सरावासाठी खेळाडू येतात. सराव सुरू असताना मैदानाच्या एका बाजूला हुपू पक्षी हिरव्या गवतात कीटक आणि कृमी शोधताना दिसले. डोक्यावरील वैशिष्ट्यपूर्ण तुरा आणि अंगावरील काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांमुळे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बेलपाडा गावचे माजी उपसरपंच संजय घरत यांनी सांगितले की, सुरुवातीला या पक्ष्यांना सुतार पक्षी समजण्यात आले. मात्र, पक्षीप्रेमी प्रदीप चौधरी आणि ज्योती नाडकर्णी यांनी ते हुपू पक्षी असल्याचे ओळखून दिले. हे पक्षी गवतामध्ये कीटक टिपताना दिसले. हुपू पक्ष्याची लांब चोच, डोक्यावरील शेंडीसारखा तुरा तसेच शेपटी, पाठ आणि पंखांवरील काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांमुळे त्याचे रूप वैशिष्ट्यपूर्ण दिसते. हा पक्षी झाडांच्या खोडांतील ढोली किंवा इमारतींच्या फटींमध्ये घरटे करतो. बेलपाडा मैदानावर या पक्ष्यांचा थवा दिसल्याने परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
