मासेमारीसाठी परप्रांतीय नौकांचा धुमाकूळ

स्थानिक मच्छिमारांमध्ये तीव्र नाराजी

| हर्णै | वृत्तसंस्था |

हर्णे येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी परप्रांतीय एलईडी, पर्ससीन नेट व फास्टर नौकांनी धुमाकूळ घातला आहे. किमान 8 ते 10 नॉटिकल मैलाच्या अंतरावरच अवैध मासेमारी सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली आहे.कमी खोलीत येऊन मासेमारी केली तर छोट्या मासेमारांनी उपाशी मरायचे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घुसखोरीवर वेळीच नियंत्रण ठेवा, अशी मागणी मच्छिमारांकडून केली जात आहे.

दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात आजूबाजूच्या गावातील मिळून एक हजाराच्या आसपास मासेमारी नौका मासेमारी व्यवसाय करतात. हर्णै गावात मासेमारांची मोठी वस्तीही आहे शिवाय बाजूच्या पाजपंढरी गावातील प्रत्येक घरातील लोक मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह चालवतात. समुद्राच्या काठावरील पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने मासेमारी व्यवसाय करत आले आहेत. या मच्छिमारांकडे ना वेगवान, ना पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या महागड्या बोटी. पारंपरिक, छोट्या बोटींच्या साहाय्याने मासेमारी करतात.

हर्णै बंदरातील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात गेल्या चार दिवसापासून किनाऱ्यापासून खूपच जवळ येऊन परप्रांतीय फास्टर आणि पर्ससीन नेट नौका अवैध बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. परप्रांतीय नौकांकडून अगदी एक इंच ते पार 10 फुटांपर्यंत लांबीचे मासे मारले जातात. त्यामुळे बंदराजवळील समुद्रात मासेच मिळणे बंद होईल. वातावरणातील बदलांमुळे मच्छिमार समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. किनाऱ्याजवळच राजरोसपणे मासेमारी होत राहिली तर भविष्यात अडचण होईल. समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणारी शासनयंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने मच्छीमार बांधव आर्थिक संकटात सापडत आहे. मासळी नाही मिळाली तर धंद्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे? अशी चिंता आहे. त्यामुळेच येथील पारंपरिक मच्छीमार हवालदिल झाला आहे.

Exit mobile version