आजी माजी प्रशिक्षणार्थी मेळावा संपन्न

| सोगाव | वार्ताहर |
आरसेटी रायगडमार्फत मुख्य कार्यालय अलिबाग येथे आजी माजी प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यासाठी आरसेटीचे राष्ट्रीय संचालक बिपुल चंद्र सहा, नोडल ऑफिसर करुणाकरा, बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक शंपा बिस्वास, आरसेटीचे महाराष्ट्र राज्य संचालक सुनील कस्तुरे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, नाबार्डचे सुधाकर रघतवान, रायगड टीमचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ आणि सचिन चव्हाण, आरसेटीचे प्रशिक्षक ललित भिस, आरसेटीचे संचालक आनंद राठोड आणि यशस्वी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान काही महिला प्रशिक्षणार्थींनी विविध वस्तूंचे स्टॉलसुद्धा लावले होते.


मेळाव्यादरम्यान प्रशिक्षणार्थीना भावी उद्योजक होण्याच्या दृष्टीने संबोधित करण्यात आले. काही प्रशिक्षणार्थींनी आरसेटी प्रशिक्षणाचे महत्व आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरचे आपले अनुभव मान्यवरांना सांगितले. आरसेटी प्रशिक्षणामुळे त्यांना कसा लाभ झाला हेही प्रशिक्षणार्थींनी सांगितले. यावेळी टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण घेतलेले अमीन मुल्ला व संजय जाधव यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर झालेल्या प्रगतीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संस्थेचे संचालकांनी मान्यवरांना आरसेटीमध्ये होणार्‍या नवीन प्रशिक्षणांची माहिती दिली तसेच रायगड आरसेटीचे काही highlights सांगितले. सदर मेळाव्यामध्ये प्रशिक्षणार्थीना आरसेटी स्थापना करण्याचा मूळ उद्देश नोडल अधिकारी श्री. करुणाकरा यांनी सांगितले तसेच सर्व प्रशिक्षणार्थीना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संचालक मा.बिपुल सहा यांनी प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले तसेच देशाला पुढे न्यायचे असेल तर स्वरोजगार हाच मार्ग आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने किमान 3 गरजू तरुण- तरुणींना आरसेटीला प्रशिक्षणासाठी पाठवावे असे आवाहन केले. मेळाव्यास आलेल्या सर्व उद्योजक आणि भावी उद्योजक यांना बँक ऑफ इंडिया कर्जासाठी मदत तसेच आरसेटी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संपूर्ण मार्गदर्शन आरसेटी करेल असे आश्‍वासन बँक ऑफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापक मा. शंपा बिस्वास यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मेळाव्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच प्रशिक्षणार्थी वर्गाचे आभार प्रदर्शन प्रसाद पाटील यांनी केले तसेच RDCC चे विशेष आभार मानले आणि मेळाव्याचे सूत्रसंचालन मीना श्रीमाळी यांनी केले. सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी आरसेटीचे कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान आहे.

Exit mobile version