नागोठण्यात सरपंचपदासाठी चौरंगी लढत

सदस्यांच्या 16 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा मतदान होणार आहे. असे असतानाच सर्वसाधारण स्त्री राखीव असलेल्या सरपंचपदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना शिंदे गट परिवर्तन पॅनेलच्या मनिषा लक्ष्मण टके व शिवसेना (उबाठा), राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इंडिया आघाडीच्या सुप्रिया संजय महाडिक यांच्यासह मनसेच्या दिपश्री किरण घासे व अपक्ष शिफा मंजर जुईकर या चार महिला उमेदवारांचा समावेश आहे.

नागोठण्यातील प्रभाग क्र.3 मधून शबाना मुल्ला या बिनविरोध निवडून आल्याने 6 प्रभागांतील उर्वरित 16 जागांसाठी इंडिया आघाडी विरूद्ध परिवर्तन पॅनेल अशी लढत होणार असून, अपक्ष उमेदवारांसह एकूण 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात काही जागांसाठी थेट, तर काही जागांसाठी तिरंगी-चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर प्रभाग क्र. 5 व 6 मधील अपक्ष उमेदवार इंडिया आघाडी व परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

नागोठण्यातील प्रभाग क्र.1 मधील सर्वसाधारण जागेसाठी दोन तर महिला सर्वसाधारण 2 जागांसाठी 4 उमेदवार आहेत. प्रभाग क्र.2 मधील ना.मा.प्र.स्री जागेसाठी 3, सर्वसाधारण स्त्री जागेसाठी 2 तर सर्वसाधारण जागेसाठी 2 उमेदवार आहेत. प्रभाग क्र.3 मध्ये ना.मा.प्र. स्त्री जागेसाठी सरळ लढत होत आहे. प्रभाग क्र.4 मध्ये ना.मा.प्र. जागेसाठी 2 तर सर्वसाधारण स्त्री 2 जागांसाठी चार उमेदवार आहेत. प्रभाग क्र.5 मध्ये अनुसूचित जाती जागेसाठी सरळ लढत होत असून, ना.मा.प्र. जागेसाठी एक अपक्ष उमेदवारासह तिरंगी लढत आहे तर सर्वसाधारण स्त्री जागेसाठीही एक अपक्ष उमेदवारासह तिरंगी लढत होणार आहे. तसेच प्रभाग क्र.6 मध्ये अनुसूचित जमाती जागेसाठी सरळ लढत होत असून, सर्वसाधारण पुरूष जागेसाठी सरळ लढत तर सर्वसाधारण स्त्री जागेसाठी दोन अपक्ष उमेदवारांसह चौरंगी लढत होणार आहे.

Exit mobile version