। पनवेल । वार्ताहर ।
स्वस्त सोन्याच्या बहाण्याने सांगलीतील व्यापार्याला खारघरमध्ये बोलावून, पोलीस असल्याची बतावणी करत त्याच्या जवळची 13.25 लाखांची रोकड लुटणार्या टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेने यशस्वीरीत्या छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी आणि रोख रकमेसह एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
या गुन्ह्यातील टोळीने सांगलीतील साखर व्यापारी मनीष शिंदे यांना स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून त्यांना खारघरमध्ये बोलावून घेतले होते. त्यानुसार 12 जानेवारी रोजी मनीष शिंदे रक्कम घेऊन आले असता, एका कारमधून आलेल्या टोळक्याने पोलीस असल्याचे भासवून त्यांच्यावर धाड टाकल्याचा बनाव करत शिंदे यांच्याकडे असलेली 13 लाख 25 हजारांची बॅग हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणात खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. त्यासाठी गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, या गुन्ह्यात वापरलेल्या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे आढळले. तसेच मोटारसायकलवरुन देखील काही आरोपी सोबत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे विशाल तुपे, रोहित शेलार आणि मनोज भंडारी या तिघांना नवी मुंबई व कल्याण परिसरातून अटक करत त्यांच्या ताब्यातून कार, दुचाकी तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल आणि रोख असा एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.






